जगातील पहिल्या वनस्पतीजन्य कोरोना लसीला कॅनडात मंजुरी | पुढारी

जगातील पहिल्या वनस्पतीजन्य कोरोना लसीला कॅनडात मंजुरी

टोरांटो ः जगभरात कोरोनाला रोखण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या लसींचा वापर केला जात आहे. आता कॅनडा सरकारने जगातील पहिल्या ‘प्लँट-बेस्ड व्हॅक्सीन’ला म्हणजेच वनस्पतीचा वापर करून बनविलेल्या लसीला मंजुरी दिली आहे. या लसीचे नाव ‘कोव्हिफेंज’ असे आहे. कॅनडाच्या क्युबेक सिटीमध्ये ही लस विकसित करण्यात आली.

कोव्हिफेंज व्हॅक्सीन ही कॅनडात बनविण्यात आलेली पहिलीच लस आहे. क्युबेक सिटीमधील मित्सुबिशी केमिकल तसेच फिलिप मॉरिसची मालकी असलेली बायोफार्मा कंपनी मेडिकागो आणि ग्लॅक्सो स्मिथक्लाईनने ही लस बनविली आहे. वनस्पतीमधील प्रोटीनचा वापर करून बनविलेली ही जगातील पहिलीच लस. सध्या कॅनडामध्ये 18 ते 64 वर्षे वयोगटातील लोकांना ही लस दिली जाणार आहे.

सरकारने म्हटले आहे की, 18 वर्षांपेक्षा कमी आणि 64 वर्षांपेक्षा अधिक वयाच्या लोकांवरील या लसीचा प्रभाव जाणून घेण्यासाठी सध्या संशोधन सुरू आहे. ही लस दोन डोसमध्ये दिली जाईल. पहिला डोस दिल्यानंतर 21 दिवसांनंतर दुसरा डोस दिला जाईल. 18 ते 64 वर्षे वयोगटातील लोकांमध्ये कोव्हिफेंज व्हॅक्सिन कोरोनाच्या सर्व व्हेरिएंट्सवर 71 टक्के परिणामकारक असल्याचे आढळले.

तसेच धोकादायक डेल्टा व्हेरिएंटविरुद्ध ही लस 75 टक्के परिणामकारक आहे. जगात कोरोनाविरुद्धच्या आतापर्यंत ज्या लसी तयार करण्यात आल्या, त्या एम-आरएनए तंत्राने किंवा व्हायरल व्हॅक्टर म्हणजेच निष्क्रिय कोरोना विषाणूने बनविल्या होत्या. मात्र, ‘कोव्हिफेंज’ यापेक्षा वेगळी लस आहे. वनस्पतींमधील विषाणूंसारखे कण ‘व्हीएलपी’चा वापर करून ती बनविली आहे.

ही लस वनस्पतींवर आधारित प्रोटीनचा वापर करून मानवी शरीरात असे कण तयार करते की, जे विषाणूच्या कणांशी मिळतेजुळते असतात. त्यामुळे शरीरात अँटीबॉडीज तयार होतात आणि कोरोनाविरुद्ध आपली रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते. या लसीचे घशात खवखव, खोकला, सांधेदुखी, स्नायुदुखी, डोकेदुखी, सर्दी-ताप, डायरिया, कंप असे काही साईड इफेक्ट्स निर्माण होऊ शकतात; जे लस घेतल्यानंतर काही तास ते काही दिवसांपर्यंत राहू शकतात.

Back to top button