नवी दिल्‍ली  : देशात पाच वर्षांमध्ये बनणार डेंग्यूची लस | पुढारी

नवी दिल्‍ली  : देशात पाच वर्षांमध्ये बनणार डेंग्यूची लस

नवी दिल्‍ली  : डासांच्या माद्या माणसाला दंश करून त्याचे रक्‍त शोषून घेत असतात. अशा अनेक प्रजातीच्या डासांच्या माद्यांमुळे विविध आजारांचा फैलाव होत असतो. एडीज इजिप्टी या प्रजातीमधील डासांच्या माद्यांमुळे डेंग्यूचा फैलाव होतो. घराच्या आसपास किंवा अगदी घरातच जर एका ठिकाणी अधिक दिवस पाणी साचून राहिले तर तिथे अशा डासांच्या माद्या अंडी घालून आपली पैदास वाढवतात. त्यांच्या दंशामुळे डेंग्यूचा धोका वाढतो. जगभरातील डेंग्यूची 70 टक्के प्रकरणे केवळ आशियातच आढळतात. 2021 मध्ये भारतात डेंग्यूची 1,64,103 प्रकरणे समोर आली होती. 2019 मध्ये ही संख्या 2,05,243 होती. आता या आजारावर मात करण्यासाठी ही लस विकसित केली जाणार आहे. त्यासाठी झालेल्या करारानुसार सरकारी आणि गैरसरकारी संस्था एकत्रितपणे संशोधन करतील व डेंग्यूवर सुरक्षित, किफायतशीर आणि प्रभावी लस बनवली जाईल. संशोधनादरम्यान प्री-क्‍लिनिकल स्टडीही होईल. आधीच उपलब्ध असलेल्या काही औषधांचा डेंग्यूवर कोणता परिणाम होतो हेही पडताळून पाहिले जाईल. त्यानंतर त्यांच्या कॉम्बिनेशनच्या किंवा नवी औषधे विकसित करून त्यांच्या चाचण्या घेण्यात येतील. ‘टीएचएसटीआय’चे कार्यकारी संचालक प्रमोद कुमार गर्ग यांनी सांगितले की डेंग्यूवर आतापर्यंत कोणतेही रामबाण अँटिव्हायरल औषध उपलब्ध नाही.

Back to top button