२१ वर्षांनंतर समजले थोरली बहीणच आहे आई !

न्यूयॉर्क ः कधी कधी खर्‍या आयुष्यातही चित्रपटांमध्ये शोभतील असे ‘ट्विस्ट’ येत असतात. नात्यांची ही गुंतागुंत पडद्याप्रमाणेच अनेकांच्या खर्‍या आयुष्याच्या पटावरही पाहायला मिळते.

असाच प्रकार न्यूयॉर्कच्या शेम ग्रीफ्स या प्रसिद्ध टिकटॉकरच्या बाबतीत घडला आहे. त्याने आपली धक्‍कदायक ‘लाईफ स्टोरी’ शेअर केली आहे. त्याने म्हटले आहे की जिला आपण 21 वर्षांपासून आपली मोठी बहीण समजत होतो तीच आपली खरी आई असल्याचे समजले!

शेमने त्याच्या टिकटॉक अकाऊंटवरून एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. त्यामध्ये त्याने सांगितले की माझ्या मोठ्या बहिणीशी माझे अतिशय घट्ट असे भावनिक नाते आहे. अन्य भावंडांप्रमाणे आम्ही बरीच मौजमस्ती करीत असतो.

मला काही दिवसांपूर्वीच समजले की जिला मी इतकी वर्षे माझी मोठी बहीण समजत होतो ती खरे तर माझी जन्मदात्री आई आहे. अगदी लहान वयातच ती गर्भवती झाली आणि तिने मला जन्म दिला, हे सांगताना मला जरा विचित्रच वाटत आहे.

माझ्या आईला गर्भपात करायचा नव्हता आणि माझ्या जन्मासंदर्भातील सर्व प्रकारच्या प्रश्‍नांना तोंड देण्यासही ती तयार होती. मात्र, मला जन्म दिल्यानंतर याबाबत समजू दिले गेले नाही.

कदाचित मी वीस वर्षांचा झाल्यावरच हे सत्य मला सांगण्याची कुटुंबीयांची योजना होती. मात्र, माझ्या आजीने माझ्यावर आईसारखेच प्रेम केले. माझ्या आईने मोठ्या बहिणीच्या भूमिकेत राहूनही तितकेच प्रेम केले.

Back to top button