‘तो’ चक्‍क हवेत तयार करतो चित्र!

तिरुवनंतपूरम ः आपल्या कलेचा आविष्कार घडवण्यासाठी कलाकाराला कोणतेही माध्यम चालते. काचेवर वाळू ठेवून, धान्यात वगैरे चित्र काढणारे कलाकार आहेत. केरळमधील एक चित्रकार तर चक्‍क हवेत चित्र बनवतो. अर्थातच हे चित्र त्याने आधी कागदावरच बनवलेले असते; पण नंतर ते हवेत साकारते. ही काय किमया आहे याचे कुतुहल अनेकांना वाटू शकते.

केरळमधील हा के.पी. रोहित नावाचा कलाकार लहान खड्यांचा वापर करून अशी चित्रे तयार करतो. या खड्यांच्या, दगडांच्या चित्रात तो रंगही भरतो. मग ही चित्रे हवेत कशी साकारतात? तो असे खडे रचून बनवलेले चित्र कागदाला झटका देऊन हवेत उडवतो आणि सहा सेकंदांसाठी ते खडे हवेत ठराविक ठिकाणी असतानाच चित्र साकारते. कन्‍नूरमधील या चित्रकाराने प्रख्यात मल्याळी अभिनेते मोहनलाल यांचे अशा पद्धतीने बनवलेले पोर्टेटही त्याने हवेत साकारून दाखवले.

त्याने अशा पद्धतीने फुटबॉलचे दिग्गज मेस्सी आणि रोनाल्डो यांचीही चित्रे बनवलेली आहेत. लॉकडाऊनच्या काळात त्याने ही कला शिकली होती. खुद्द मोहनलाल यांनीही त्याचे कौतुक केले आहे. चित्रांचे दगड एका फटक्यात हवेत उडवल्यानंतर ते द‍ृश्य स्लो मोशनमध्ये पाहिले तर चक्‍क हवेतच चित्र साकार झाल्यासारखे दिसते!

Back to top button