जगातील सर्वात वृद्ध पाळीव मासा | पुढारी

जगातील सर्वात वृद्ध पाळीव मासा

न्यूयॉर्क : अनेक घरे व अन्य इमारतींमध्ये अ‍ॅक्वॅरियम पाहायला मिळत असते. काचेच्या पेटीतील असे रंगीबेरंगी, लहान-मोठे मासे पाहणे सर्वांनाच आवडते. हे मासे काही मर्यादित काळापर्यंतच जगत असतात. अशा पाळीव माशांमध्ये एक मासा मात्र चांगलाच दीर्घायुष्यी ठरला आहे. अमेरिकेतील या ‘मेथुसेलह’ नावाच्या माशाचे वय तब्बल 90 वर्षे आहे! अ‍ॅक्वॅरियममध्ये राहणारा हा जगातील सर्वात वृद्ध मासा ठरला आहे.

कॅलिफोर्निया अ‍ॅकॅडमी ऑफ सायन्सेजच्या बायोलॉजिस्टनी म्हटले आहे की या माशाचे वय 90 वर्षांचे आहे आणि अ‍ॅक्वॅरियममध्ये त्याच्या प्रजातीचा अन्य मासा नाही. हा मासा ताजे फिग्ज खातो आणि केअरटेकर त्याला बेली मसाजही देतात. या माशाची लांबी 4 फूट असून वजन सुमारे 18 किलो आहे. ऑस्ट्रेलियन लंगफिश प्रजातीचा हा मासा आहे. त्याला 1938 मध्ये ऑस्ट्रेलियाच्या सॅन फ्रान्सिस्कोच्या म्यूझियममध्ये आणण्यात आले होते.

या प्रजातीच्या माशांमध्ये फुफ्फुसं आणि गिल्स असे श्वसन यंत्रणेतील दोन्ही प्रकारचे अवयव असतात. जलचर आणि भूचर प्राण्यांमधील हा एक दुवा असल्याचे मानले जाते. त्याची देखभाल करणार्‍या अ‍ॅलन जेन यांनी सांगितले की ही एक मादी असावी असा केवळ अंदाज आहे. अद्याप या माशाची ब्लड व बॉडी टेस्ट झालेली नसल्याने तो नर आहे की मादी हे निश्चित समजलेले नाही. त्याच्या पराचा एक अंश चाचणीसाठी ऑस्ट्रेलियात पाठवला जाणार आहे. त्यामधून त्याचे नेमके वय आणि लिंग समजू शकेल.

Back to top button