मंगळावर आढळले जांभळट खडक | पुढारी

मंगळावर आढळले जांभळट खडक

वॉशिंग्टन : तांबडा ग्रह असलेल्या मंगळावर जांभळट रंगाचे अनोखे खडक आढळून आले आहेत. ‘नासा’च्या पर्सिव्हरन्स रोव्हरने हे दगड शोधले आहेत. जेझेरो असे नाव दिलेल्या तेथील विस्तीर्ण क्रेटरमध्ये म्हणजेच विवरात सर्वत्र असे जांभळट रंगाचे छोटे-मोठे दगड विखुरलेले आहेत. या रहस्यमय जांभळ्या रंगाच्या दगडांची निर्मिती कशी झाली हे अद्याप समजलेले नाही.

जियोकेमिस्ट एन. ओलिला यांनी सांगितले की पर्सिव्हरन्स रोव्हरकडून जो डेटा मिळालेला आहे त्यामधून या रहस्यमय दगडांची स्पष्ट माहिती मिळत नाही. ओलिला यांनी अमेरिकन जियोफिजिकल युनियनमध्ये नॅशनल जिओग्राफिकला याबाबतची माहिती दिली. यापूर्वी मंगळभूमीवर हिरवट रंगाचेही दगड आढळले होते. सन 2016 मध्ये ‘क्युरिऑसिटी’ रोव्हरने माऊंट शार्प या तेथील पर्वताजवळ अशा हिरवट रंगाच्या दगडांचा शोध घेतला होता. मंगळावर असे वेगवेगळ्या रंगांचे दगड आहेत आणि त्यांच्यामध्ये काही ना काही वेगळेपण आहे.

सध्या पड्र्यू युनिव्हर्सिटीचे ब्रॅडली गार्सिन्की यांची टीम या जांभळट दगडांवर संशोधन करीत आहे. पर्सिव्हरन्स रोव्हरच्या ‘मास्टकॅम-झेड’ कॅमेर्‍याने तसेच ‘आयकॅम’ या कॅमेर्‍याने अशा जांभळट दगडांची छायाचित्रे टिपून घेतलेली आहेत. आता या छायाचित्रांच्या आधारे ब्रॅडली गार्सिन्की यांची टीम त्यांच्याबाबतचे संशोधन करीत आहे. आम्हीही हे दगड पाहून चकीत झालो आहोत असे त्यांनी म्हटले आहे.

ओलिला यांची टीम या दगडांचा वरचा स्तर पर्सिव्हरन्स रोव्हरमधून लेझर शूट करून वितळवणार आहेत व त्याचा अभ्यास करणार आहेत. हा जांभळट स्तर मुलायम असून त्याची रासायनिक रचना वेगळी आहे. दगडाचा आतील स्तर वेगळ्या प्रकारचा आहे. हे एखादे सूक्ष्मजीव आहेत का? सूर्याच्या तीव्र रेडिएशनपासून बचाव करण्यासाठी त्यांनी हे आवरण घेतले आहे का याबाबतही संशोधन केले जाईल.

Back to top button