‘या’ देशांमध्ये नाही एकही कोरोना रुग्ण! | पुढारी

‘या’ देशांमध्ये नाही एकही कोरोना रुग्ण!

वेलिंग्टन : न्यूझीलंडजवळ असलेल्या ‘कूक आयलंड’ या साऊथ पॅसिफिक देशात कोरोनाचा एकही रुग्ण नाही. कोरोनाची बातमी आल्यापासूनच या देशाने आपल्या सीमा बंद केल्या होत्या. आता या बेटाच्या देशाच्या सीमा परदेशी लोकांसाठी खुल्या केल्या आहेत. देशातील 97 टक्के नागरिकांचे लसीकरणही पूर्ण झाले आहे. असे अन्यही काही देश जगभरात आहेत.

जगातील अनेक देशांनी काटेकोरपणे सीमा बंद केल्या होत्या. त्यामध्ये उत्तर कोरियाचाही समावेश आहे. केवळ लोकांसाठीच नव्हे तर अन्न व इतर वस्तूंच्या आयातीसाठीही या देशाने सीमा बंद ठेवली होती. त्याचा लोकांना प्रचंड त्रासही सहन करावा लागला आहे. किरीबाटी या मध्य पॅसिफिकमधील देशानेही परदेशी लोकांना आपल्या देशात येऊ दिले नाही. कोरोनाची पहिली बातमी आल्यापासूनच हे धोरण राबवण्यात आल्याने तिथेही कोरोनाचा रुग्ण सापडला नाही.

नौरू या देशाने दोन वर्षांपासून बंद असलेल्या आपल्या सीमा आता पर्यटकांसाठी खुल्या केल्या आहेत. पूर्ण लसीकरण झालेल्या नागरिकांना आता देशात प्रवेश दिला जात आहे. या देशाच्या एकाही नागरिकाला अद्याप कोरोनाची लागण झालेली नाही. तुवालू या देशानेही आपल्या सीमा बंद केल्याचा सकारात्मक परिणाम दिसून आला. एकही कोरोना रुग्ण न आढळल्याने एप्रिल 2021 पासून या देशाने पर्यटकांसाठी सीमा खुल्या केल्या होत्या. पिटकर्न आयलंड या देशानेही सीमा बंद ठेवल्या असून त्या 31 मार्च 2022 या दिवशी खुल्या केल्या जाणार आहेत.

Back to top button