दहाव्या वर्षी 'ती' चालवतेय दोन कंपन्या; पंधराव्या वर्षी घेणार निवृत्ती! - पुढारी

दहाव्या वर्षी 'ती' चालवतेय दोन कंपन्या; पंधराव्या वर्षी घेणार निवृत्ती!

सिडनी : वयाच्या अवघ्या दहाव्या वर्षी मुलं शाळा, अभ्यास, खेळ, मित्र-मैत्रिणी, खाऊ यामध्येच गुंग असतात. मात्र, या वयातच ऑस्ट्रेलियातील एक मुलगी दोन कंपन्या चालवत आहे. विशेष म्हणजे तिने भविष्याची योजनाही आखून ठेवलेली आहे. आपण पंधराव्या वर्षी निवृत्त होऊ असे तिने म्हटले आहे.

ऑस्ट्रेलिया तील या मुलीचे नाव आहे पिक्सी कर्टिस. तिने आपल्या आईच्या मदतीने एक कंपनी सुरू केली. या कंपनीचे नाव पिक्सीज फिजेटस् असे आहे. गेल्या वर्षी तिने ही कंपनी सुरू केली असून पिक्सी या कंपनीची सीईओ आहे. तिने ही कंपनी सुरू केली तेव्हा फक्त 48 तासांमध्येच तिची सर्व खेळणी विकली गेली होती. या कंपनीच्या आधीपासूनच ती आणखी एक बिझनेस कंपनी चालवत होती. या कंपनीचे नाव आहे ‘पिक्सीज बोव्ज’. ही कंपनी केसांशी संबंधित सामान विकते.

पिक्सीने वयाच्या पंधराव्या वर्षी आपण निवृत्ती घेणार असल्याचे तिच्या आई-वडिलांना सांगितले आहे. इतक्या लहान वयात निवृत्ती घेणारीही ती पहिलीच मुलगी ठरेल. पिक्सीचे इन्स्टाग्रामवर एक लाखापेक्षाही अधिक फॉलोअर्स आहेत. ती 49.72 कोटी रुपयांच्या घरात राहते व 1.40 कोटी रुपयांच्या मोटारीतून भावासमवेत शाळेला जाते!

Back to top button