संशोधकांनी बनवली कृत्रिम किडनी! - पुढारी

संशोधकांनी बनवली कृत्रिम किडनी!

न्यूयॉर्क : हृदय, मेंदू, फुफ्फुसं, यकृत आणि किडनी म्हणजेच मूत्रपिंड यापैकी एका जरी अवयवाचे काम थांबले तरी मरण ओढवते. जगभरात अनेक लोक किडनीच्या विविध समस्यांनी त्रस्त असतात. किडनी प्रत्यारोपण आणि डायलेसिससाठी रुग्णांना बराच वेळ वाट पाहावी लागते. आता त्यावर उपाय म्हणून संशोधकांनी आर्टिफिशियल किडनी म्हणजेच कृत्रिम मूत्रपिंड तयार करण्यात यश मिळवले आहे.

किडनी प्रोजेक्टचे हे पहिलेच डिमॉन्स्ट्रेशन आहे. कृत्रिम किडनीचा आकार स्मार्टफोनच्या आकाराइतका असतो. त्यामध्ये दोन आवश्यक भाग आहेत. हेमोफिल्टर आणि बायोरिअ‍ॅक्टर एकत्र करून प्रीक्लिनिकल इव्हॉल्युशनसाठी यशस्वीरीत्या वापर करण्यात आला आहे.

संशोधकांनी यापूर्वी हिमोफिल्टरची वेगळी चाचणी केली होती. हिमोफिल्टरचा वापर रक्तातील नको असलेल्या गोष्टी आणि विषारी घटक काढून टाकण्यासाठी केला जातो. बायोरिअ‍ॅक्टरचीही अनेक पातळ्यांवर चाचणी करण्यात आली. बायोरिअ‍ॅक्टरचा वापर किडनीशी संबंधित इतर कार्यांसाठी केला जातो. कृत्रिम किडनीला काम करण्यासाठी रक्तदाबाचा दाब पुरेसा आहे.

यासाठी रक्त पातळ करणार्‍या औषधांची किंवा अन्य प्रकारच्या कोणत्याही औषधांची गरज नाही. कृत्रिम किडनी अधिक योग्य पद्धतीने कार्य करू शकते आणि डायलेसिसपेक्षा चांगले परिणाम देते. कृत्रिम किडनी डायलेसिसपेक्षा कमी वेळ लागतो आणि त्यासाठी वारंवार क्लिनिकला जाण्याची आवश्यकता नाही. भविष्यात ही कृत्रिम किडनी अनेक रुग्णांना दिलासा देऊ शकेल.

Back to top button