कोरोना काळात प्रचंड वाढली माकडांची संख्या

बँकॉक : गेल्या दोन वर्षांपासून जगभर सुरू असलेला कोरोनाचा प्रकोप आजही कायम आहे. अमेरिका, भारतासह अनेक देशांमध्ये रोज लाखांहून अधिक नवे बाधित सापडत आहेत. या विषाणूचा मानवी जीवनावर प्रतिकूल परिणाम झाला आहे. लॉकडाऊनमुळे लोक घरात कैद झाल्याने असंख्य प्राणी अन्न-पाण्याशिवाय तडफडू लागले आहेत. मात्र, अशा स्थितीतही थायलंडमधील एका शहरात या महामारी काळात माकडांची संख्या इतकी वाढली आहे की, याचा परिणाम सध्या तेथील मानवी जीवनावर होत आहे.
थायलंडमधील ‘लॉपबुरी’ या शहरात दीर्घकाळापासून मकाक्स प्रजातीच्या माकडांचे वास्तव्य आहे. मात्र, कोरोना काळात या माकडांची संख्या अचानक मोठ्या प्रमाणात वाढली. ‘डेली स्टार’च्या माहितीनुसार, या शहरात जगभरातील पर्यटक फिरण्यासाठी येतात. ते माकडांना खाण्या-पिण्याचे पदार्थ देतात. त्यामुळे त्यांचे पोट भरत असे. मात्र, कोरोनामुळे पर्यटकांचे येणे थांबले आणि भुकेल्या माकडांनी शहरवासीयांचे जीवन अवघड करून टाकले आहे. ही माकडे आता थेट लोकांच्या घरात घुसू लागली आहेत.
गेल्या नोव्हेंबरपासून पुन्हा पर्यटक येऊ लागले. त्यावेळी त्यांना माकडांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढल्याचे दिसून आले. ही माकडे आता घरांवर हल्ले करून खाण्याचे पदार्थ लंपास करू लागली आहेत. माकडांच्या दहशतीमुळे लोकांचे रस्त्यावर फिरणेही अवघड बनले आहे. ही दहशत इतकी वाढली आहे की, लोक घरे सोडून अन्यत्र जात आहेत. याशिवाय माकडांचे कळप एकमेकांत भांडत असल्याने दहशतीत भर पडू लागली आहे. यावर कसे नियंत्रण मिळवावे, असा प्रश्न शासनाला पडला आहे.