वेगाने थंड होत आहे पृथ्वीचा अंतर्गत भाग - पुढारी

वेगाने थंड होत आहे पृथ्वीचा अंतर्गत भाग

न्यूयॉर्क : सुमारे 4.5 अब्ज वर्षांपूर्वी पृथ्वीच्या निर्मितीस सुरुवात झाली होती. इतका दीर्घ कालावधी उलटूनही पृथ्वी आतून आजही पूर्णपणे थंड झालेली नाही. पृथ्वी थंड होत आहे, यात संशय नसला तरी ती किती वेगाने थंड होत आहे? याचे स्पष्ट उत्तर नाही. यासंदर्भात ज्यूरिचच्या इटीएचच्या संशोधकांनी नवे संशोधन केले.

पृथ्वीच्या कोअर आणि मेेंटल या आवरणांदरम्यान असलेले खनिज हे उष्माचालक आहे, हे संशोधनातील प्रयोगाद्वारे स्पष्ट करण्यात आले. तसेच पृथ्वीच्या पोटात असलेली उष्णता ही अंदाजापेक्षाही कमी कालावधीत उडून जाऊ शकते, असा निष्कर्ष प्रयोगातून काढण्यात आला.

सुमारे 4.5 अब्ज वर्षांपूर्वी पृथ्वी प्रचंड तापमानाच्या काळातून मार्गक्रमण करत होती. याशिवाय ती तप्त मॅग्माच्या महासागरांनी व्यापलेली होती. लाखो वर्षांनंतर पृथ्वीचे वरील आवरण थंड झाले व ठोस जमीन तयार झाली. मात्र, पृथ्वीच्या आंतरिक भागात मोठ्या प्रमाणात उष्णता कायम राहिली. कालांतराने या भागात मेंटल संवहन, प्लेट टेक्टॉनिक, ज्वालामुखी अशा भूगर्भीय प्रक्रियांना सुरुवात झाली. असे असले तरी पृथ्वी किती थंड झाली व उर्वरित उष्मा सोडण्याची प्रक्रिया आणखी किती काळ चालणार? याचे उत्तर आजही स्पष्टपणे मिळालेले नाही. पृथ्वीचे कोअर आणि मेंटल यांच्यामधील भाग अत्यंत महत्त्वाचा आहे. हा भाग तप्त लोह आणि निकेलच्या मिश्रणाच्या संपर्कात येतो. त्यामुळे या भागात उष्णतेचे प्रमाणही प्रचंड आहे. या भागातील उष्णता कमी होत असल्याने पृथ्वीचा थंड होण्याचा वेगही वाढू शकतो, असे संशोधकांचे मत आहे.

Back to top button