'या' लघुग्रहावर पोहोचण्यास ११ हजार वर्षांत एकच संधी - पुढारी

'या' लघुग्रहावर पोहोचण्यास ११ हजार वर्षांत एकच संधी

वॉशिंग्टन : आपल्या सूर्यमालेपासून सर्वाधिक अंतरावर असलेल्या ‘सेडना’ या खगोलीय पिंडाचा 2003 मध्ये शोध लावण्यात आला होता. नेपच्यूनच्या तुलनेत ‘सेडना’ हा तीन पटीने जास्त अंतरावर आहे. यामुळे या लघुग्रहाला सूर्याभोवतीचा एक फेरा पूर्ण करण्यासाठी तब्बल 11,400 वर्षे लागतात. असे असले तरी एका संशोधन पत्रिकेतील माहितीनुसार ‘सेडना’ या दीर्घ अंतरावर असलेल्या अवकाशीय पिंडावरही एखाद मिशन आयोजित केले जाऊ शकते. हे मिशन 2029 ते 2034 या दरम्यान लाँच केले जाऊ शकते.

जर शास्त्रज्ञांनी यावेळी ‘सेडना’वर पोहोचण्याची संधी सोडली तर पुढील 11 हजार वर्षांत पुन्हा ते शक्य होणार नाही. आपल्या सूर्यमालेबाहेर असलेल्या विशाल ग्रहांच्या कक्षेपासून दूर असलेला ‘सेडना’ हा एक बर्फाळ अवकाशीय पिंड आहे. 2012 मध्ये सेडना हा व्हीपी 113 नजीक होता. सेडनाला ‘बायडन’ या नावानेही ओळखले जाते. त्यावेळी जो बायडन हे अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष होते.

सेडना हा सूर्यापासून तब्बल 937 ‘एयू’ अंतरावर आहे. सूर्यमालेतील अंतर मोजण्यासाठी एयूचा वापर केला जातो. या मापानुसार सूर्य आणि नेपच्यून यांच्यातील अंतर 30 एयू म्हणजे 4.4747 अब्ज कि.मी.आहे. आपल्या सूर्यमालेपासून प्रदीर्घ अंतरावर सेडना असल्याने तेथे जाणे अत्यंत अवघड असले तरी संशोधक तेथे मोहीम पाठविण्याच्या विचारात आहेत. याचे कारण म्हणजे सेडना हा लाल रंगाचा आहे. त्यामुळे तेथे थॉलिन्स नामक हायड्रोकार्बन कंपाऊंड असण्याची शक्यता आहे. याशिवाय हा लघुग्रह बर्फाने आच्छादलेला आहे. त्यामुळे त्याच्याखाली महासागरही असू शकतात.

Back to top button