मोबाईलप्रेमींसाठी रोबोटिक ‘तिसरा डोळा’! | पुढारी

मोबाईलप्रेमींसाठी रोबोटिक ‘तिसरा डोळा’!

सेऊल : अनेक लोकांना रस्त्यावरून चालत असतानाही मोबाईल पाहण्याची सवय असते. अशी माणसं कधी कुणाला धडकतील हे काही सांगता येत नाही. आता लोकांची ही सवय लक्षात घेऊन दक्षिण कोरियातील संशोधकांनी खास ‘तिसरा डोळा’ तयार केला आहे. हा रोबोटिक डोळा कपाळावर लावल्यानंतर रस्त्यावरील अडथळ्यांकडे लक्ष देता येते व याबाबत वेळीच सावध करता येते.

पेंग मिन वूक नावाच्या संशोधकाने हा तिसरा डोळा विकसित केला आहे. त्यांनी या डोळ्याला ‘द थर्ड आय’ असेच नाव दिले आहे. हा एक प्रकारचा रोबोटिक आयबॉल आहे. सामान्य डोळ्यांप्रमाणेच तो काम करतो आणि रस्त्यावरून चालत जात असताना समोर असणार्‍या अडथळ्यांना टिपून घेतो. या रोबोटिक आयबॉलमध्ये एक सेन्सर बसवलेला आहे. त्याच्यामुळे रस्त्यामधील एखादा अडथळा दिसून आला तर हा आयबॉल कंपन करू लागतो व समोरच्या अडथळ्याबाबत यूजरला सावध करतो. त्यामुळे यूजर जागीच थांबू शकतो.

कपाळावर असा तिसरा डोळा लावून कुणीही मोबाईल पाहत चालू शकतो असा वैज्ञानिकाचा दावा आहे. अर्थातच मोबाईलच्या आहारी गेलेल्या लोकांना एकीकडे सुधरवण्याचा प्रयत्न सुरू असताना त्यांच्या या ‘व्यसना’ला खतपाणी घालण्याचाच हा प्रकार असल्याने अनेकांनी त्यावर टीकाही केली आहे!

Back to top button