शिवाजी पुलाचे पिकनिक पॉइंट करणे प्रशासनाला झेपेल का?

Published on
Updated on

कोल्हापूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावरील पंचगंगा नदीवरील नवीन पूल बांधून झाला आहे. आता जुन्या पुलाचे काय? हा प्रश्न आपसुकच सर्वांच्या मनाला सतावू लागल्यानंतर उत्तर मिळाले ते म्हणजे  पिकनिक  पॉइंट . हे ऐकल्यावर सर्वांनाचा आनंद झाला. कारण कोल्हापूरच्या प्रेक्षणीय स्थळांमध्ये आणखी एका स्थळाची भर पडणार. पण तितकेच वाईटही वाटले. आत्ता अस्तित्वात असलेल्या ऐतिहासिक स्थळाची झालेली दुर्दशा पाहता. या दुर्दशेत आणखी एका प्रेक्षणीय स्थळाची भर पडण्याची दाट शक्यता आहे. 

कारणही तसेच आहे. कलेचे माहेरघर म्हणून कोल्हापूर शहराची ख्याती आहे. समृद्ध ऐतिहासिक वारसा लाभलेल्या या शहराला दरवर्षी  लाखो पर्यटक आवर्जून भेट देत असतात. कोल्हापुरातील पर्यटन स्थळ म्हटलं की, रंकाळा तलाव, खासबाग मैदान, पन्हाळगड, टाउनहॉल वस्तुसंग्रहालय, पन्हाळगड, अशी अनेक प्रेक्षणीय स्थळे नजरेसमोर उभी राहतात.

पण याचे वेळोवेळी जतन केले जाते का? हा प्रश्न प्रामुख्यान वास्तु आणि पर्यटन स्थळे पाहिल्यावर उभा राहतो. सध्या कोल्हापुरात कचरा करणार्‍यांना सुधारायचे कसे? असा प्रश्नही उपस्थित झाला आहे. महापालिकेच्या पुढाकाराने शहरात लोकसहभागातून स्वच्छता मोहिमेसारखा आदर्श उपक्रम सुरू आहे. जयंती नाला, उद्याने, रंकाळा अशी ठिकाणी साचलेले कचर्‍याचे ढीग उचलले जात आहेत. पण यांच्या या यादीत भविष्यात आणखी एका ठिकाणाची भर पडायला नको असे वाटते.  

कोल्हापूरमधील प्रेक्षणीय स्थळ म्हणून रंकाळा तलावाचा प्रामुख्याने उल्लेख होतो. या रमणीय ठिकाणी संध्याकाळच्या वेळी कोल्हापूरमधील बहुसंख्य नागरिक मोठ्या संख्येने फिरावयास जातात. या रंकाळ्याची निगा कितपत राखली जाते हे काही सांगायची गरज नाही.

 फिरावयास येणारे नागरिक असो किंवा पर्यटक. हातागाड्यावर घेतलेले खाद्यपदार्थ खाऊन झाले की त्याचा कागद किंवा शिल्लक राहिलेले खरखटे, तसेच प्लास्टिक कचरा रंकाळ्यात मोठ्या प्रमाणात त्यांच्याकडून टाकला जात असतो. रंकाळा तलावात कचरा टाकू नये यासाठी जनजागृती अनेकवेळा करून सुद्धा ही परिस्थिती कायम असलेली पाहावयास मिळते. 

हे असे पंचगंगा नदीवरील शिवाजी पुलाच्याबाबतीत घडणार नाही कशावरून?  शिवाजी पूल हा पिकनिक  पॉइंट ही खूप छान कल्पना आहे. पण रंकाळा तलावाच्या बाबतीत जे घडते ते उद्या पंचगंगा नदीच्या बाबतीत घडले तर? अशी भीती व्यक्त होत आहे.

सुमारे १४० वर्षे वाहतुकीचा भार पेलणारा आणि कोल्हापूर-कोकणाला जोडणारा पंचगंगा नदीवरील शिवाजी पूल त्याचे आयुर्मान संपले असल्याने पर्यायी पुलाची उभारणी करण्यात आली. नवीन पुलाची पाहणी नुकतीच खा. संभाजीराजे यांनी केली. त्यावेळी शिवाजी पूल हेरिटेज वास्तू आहे. त्याचा हेरिटेज लूक कायम ठेवून तेथे आणखी सुधारणा करून हेरिटेज पॉईंट केला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. 

ही कल्पना जितकी चांगली आहे तितकीच धोक्याचीदेखील आहे. प्रदुषणासोबत पर्यटकांच्या जीवाचादेखील प्रश्न आहे. लहानग्यांपासून ते वृद्धापर्यंत सेल्फी, फोटोची क्रेज आहे. सेल्फी काढण्याच्या नादात अनेकांचे जीव गेलेल्या घटना ऐकायला, पाहायला, वाचयला, मिळाल्या आहेत. शिवाजी पुलावर असे प्रकार होणार नाहीत याची काळजी  घ्यावी लागेल. तसेच नदीचे प्रदुषण पर्यटकांकडून होणार नाही हेही पाहावे लागेल.

पर्यटकांसाठी स्वतंत्र पार्किंगचीही गरज आहे. श्री आंबाबाई, रंकाळ्यासह जिल्ह्यात पर्यटनासाठी येणाऱ्यांची संख्या गेल्या दहा वर्षांत वाढली आहे. त्यामुळे पर्यटकांच्या वाहनांच्या संख्येतही वाढ झाली आहे. या वाहनांच्या पार्किंगची नीट व्यवस्था नसल्याने जागा मिळेल तेथे ही वाहने लावली जातात. त्याचा फटका वाहतूक शिस्तीला बसत असतो. हा वाहतूक शिस्तीचा प्रश्न जुना शिवाजी पुलाचे पिकनिक पॉईंटमध्ये रूपांतर केल्यावर वाढणार हे निश्चित. वाहन चालकांना वाहतुकीच्या नियमांचे काटेकोर पालन करण्याबरोबरच स्वयंशिस्तही जोपासावी असे आवाहन प्रादेशिक परिवहन विभागाकडून अनेकदा केले जाते. पण त्याकडे दुर्लक्ष करणारेच जास्त असतात. 

शेकडो वर्षांपासून कोल्हापूरची संरक्षक तटबंदी म्हणून बिंदू चौकातील ऐतिहासिक तटाची ओळख आहे. या तटाच्या जतन-संवर्धन आणि संरक्षणासाठी कोणतीही विशेष उपाययोजना नसल्याने याची अवस्था अत्यंत दयनीय बनली आहे.

तटाचे निखळलेले दगड पडू लागल्याने ते लोकांसाठी धोकादायक बनले आहेत. महापालिकेने तयार केलेल्या ऐतिहासिक वास्तूंच्या यादीत याचा समावेश असतानाही याची अशी अवस्था मग अशा परिस्थितीत जुना शिवाजी पुलाचा पिकनिक पॉईंट करणे प्रशासनाला झेपेल का?

 या सगळ्याचा विचार करुन लोकांना खरेच एक चांगला विरंगुळ्याचा स्पॉट तयार झाला तर कोल्हापूरकर आणि इथे येणारे पर्यटक नक्कीच आनंदी आणि समाधानी होतील.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news