सोलापूर : राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बळीराम काका साठे यांचा राजीनामा | पुढारी

सोलापूर : राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बळीराम काका साठे यांचा राजीनामा

सोलापूर, पुढारी ऑनलाईन : राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्ह्याचे अध्यक्ष जिल्हा परिषदेचे विरोधी पक्षनेते बळीराम काका साठे यांनी आपल्या जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्याची माहिती समोर आली आहे. त्याला स्वतः काका साठे यांनी दुजोरा दिला. बुधवारी सायंकाळी सहा वाजता त्यांनी आपला राजीनामा प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडे पाठवला आहे. वय जास्त झाल्याने सर्वत्र फिरणे होत नाही त्यामुळे पक्षाला वेळ देता येईना, उगीच त्रास कशाला म्हणून आपण जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्याची माहिती काका साठे यांनी दिली.

विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर उमेश पाटील यांना पक्षाने अध्यक्षपद देण्याचे नियोजन केले होते. मात्र काही नेत्यांनी विरोध केला. काका साठे यांनी नको म्हणताना ही त्यांच्या गळ्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष पद टाकण्यात आले होते. निवडणूक झाली, जिल्ह्यात पक्षाने बरे यश मिळाले, काकांचे नाव झाले.

मात्र काका साठे यांचे 75 वर्षे वय झाल्याने त्यांना जिल्ह्यात फिरणे शक्य होत नाही, आता तब्येत ही साथ देत नाही, यातच राष्ट्रवादी काँग्रेसचा एक गट पद काढण्यासाठी धडपड करत होता, त्यात माजी जिल्हाध्यक्ष आघाडीवर होते अशी चर्चा खुद्द काका साठे यांच्याकडून ऐकण्यास मिळाली.

आपल्या तक्रारी केल्या जात आहेत म्हणून काका काहीसे वैतागल्याच चित्र होतं. पण आपण जोपर्यंत मोठे साहेब सांगणार नाहीत तोपर्यंत राजीनामा देणार नाही अशी भूमिका काही दिवसांपूर्वी पत्रकारांसमोर बोलून दाखवली होती. आता आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुका आहेत, याच पार्श्वभूमीवर पक्षाला पळणारा जिल्हाध्यक्ष आवश्यक असल्याची चर्चा होती. सर्वांना सोबत घेऊन जिल्हा परिषद पंचायत समितीची सर्व सूत्रे जुळवाजुळवी करण्यासाठी नवा चेहरा राष्ट्रवादीला अपेक्षित असल्याचे बोलले जात होते. त्याच पार्श्वभूमीवर जिल्हाध्यक्ष काका साठे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याने राजकीय चर्चेला ऊत आला आहे.  हा राजीनामा पक्ष स्वीकारणार का, हा सुद्धा प्रश्न उपस्थित होत आहे.

Back to top button