सांगली : स्वतःच्या अपहरणाचा बनाव करणाऱ्या युवकाच्या पोलीसांनी मुसक्या आवळल्या - पुढारी

सांगली : स्वतःच्या अपहरणाचा बनाव करणाऱ्या युवकाच्या पोलीसांनी मुसक्या आवळल्या

विटा; पुढारी वृत्तसेवा

अपहरणाचा बनाव करून रफूचक्कर झालेल्या तरुणाच्या विटा पोलिसांनी मुसक्या आवळल्या. समाधान महेंद्र खडसे उर्फ समाधान स्वामी (वय २८) असे अटक केलेल्या तरूणाचे नाव असून नैराश्यातून त्याने हा प्रकार केल्याचे प्राथमिक तपासातून पुढे आले आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, विटा येथे समाधान महेंद्र खडसे उर्फ समाधान स्वामी याचा खानापूर रस्त्यावर फॅब्रिकेशनचा व्यवसाय आहे.

बुधवारी रात्री साडेअकरा वाजता समाधानचे नागेवाडी (ता.खानापूर) येथून अज्ञातांनी अपहरण केल्याची फिर्याद त्याचा मावसभाऊ मोरेश्वर भोगेंद्र कपाळे (रा. मायणी, ता.खटाव) यांनी विटा पोलिसांत दिली होती. त्यावरून भा.द.वि. स. कलम ३६५ प्रमाणे पोलिसांत गुन्हा दाखल होता.

त्यानुसार पोलीसांनी या घटनेचा तपास सुरू केला. समाधानचे ज्या ठिकाणाहून अपहरण झाले त्या नागेवाडीच्या पुलाजवळ त्यांची मोटर सायकल, टी शर्ट, जॅकेट तसेच फुटलेल्या अवस्थेतील मोबाईल, आधार कार्डसह इतर साहित्य आढळून आले.

यावरून हा अपहरणाचा प्रकार आहे की घातपाताचा प्रकार याबात प्रश्न उपस्थित झाले. त्यानंतर पोलीसांनी श्वानपथक तसेच तांत्रिकदृष्टया याचा सखोल तपास व मित्र, नातेवाईक यांचेकडे कसून चौकशी सुरू केली.

दरम्यान, तो आज शुक्रवारी दुपारी पुण्यात असल्याची माहिती पोलिसांना मिळताच रात्री साडेआठच्या सुमारास पोलीस ठाण्यात आणण्यात आले.

याबाबत पोलिस निरीक्षक संतोष डोके यांनी सांगितले की, समाधान याने स्वतःच आपल्या अपहरणाचा बनाव रचला होता. विटा परिसरातील अनेकांकडून घेतलेल्या पैशाचे देणे तो लागत होता. त्यामुळे तो मानसिक तणावाखाली होता. बुधवारी दुपारी त्याने एका बँकेतून दोन लाख रुपये रक्कम काढली होती. त्यानंतर तो मायणी, विटा, कराड, नाशिक व पुणे या ठिकाणी गेल्याचे त्याच्या मोबाईल लोकेशन्स वरून निष्पन्न झाले. त्यामुळेच त्याचा ठावठिकाणा लागल्याचे पोलीस निरीक्षक डोके यांनी सांगितले.

या तपास मोहिमेत उपविभागीय पोलीस अधीकारी पद्मा कदम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय शेंडगे, अंमलदार अमर सुर्यवंशी, पोलीस कर्मचारी हणमंत लोहार, सुरेश भोसले, शशिकांत माळी, नवनाथ देवकते, पुंडलिक कुंभार, सागर निकम, अक्षय जगदाळे, रोहित पाटील, सायबर पोलीस ठाण्याकडील कॅप्टन गुंडवडे, प्रकाश पाटील सहभागी झाले होते.

हेही वाचा

Back to top button