” माझ्‍या ट्रॅक्‍टरचे पैसे वसुल झाले”: पाकिस्‍तानचा फॅन सूर्यकुमारच्‍या खेळीवर खूष!

” माझ्‍या ट्रॅक्‍टरचे पैसे वसुल झाले”: पाकिस्‍तानचा फॅन सूर्यकुमारच्‍या खेळीवर खूष!
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : सामन्‍याच्‍या प्रत्‍येक क्षणाला कमालीची वाढणारी उत्‍कंठा…. प्रत्‍येक चेंडूनुसार वाढणारा संघर्ष आणि अखेर सामना जिंकणार्‍या देशातील चाहत्‍यांचा ओसंडून वाहणारा आनंद… हे सारं काही फक्‍त आणि फक्‍त क्रिकेटमधील भारत आणि पाकिस्‍तान सामन्‍यावेळी अनुभवता येते. चाहत्‍यांमुळेच कोणत्‍याही खेळाला प्रोत्‍साहन मिळते. भारत आणि पाकिस्‍तानमध्‍येही अशाच जबरा फॅनची नेहमीच चर्चा होते. आता अशीच चर्चा आपला ट्रॅक्‍टर विकून भारत आणि पाकिस्‍तान सामना पाहण्‍यासाठी आलेल्‍या पाकिस्‍तानच्‍या फॅनची ( चाहता) होत आहे. मात्र त्‍याचे कारण थोडे वेगळे आहे. कारण त्‍याने भारत आणि अमेरिका सामन्‍यात पाकिस्‍तानची जर्सी घालून भारताचे समर्थन केले. सूर्यकुमारच्‍या खेळीने त्‍यांचे मन जिंकले.

भारत आणि पाकिस्‍तान यांच्‍यातील क्रिकेट सामन्‍याकडे संपूर्ण जगातील क्रिकेटविश्‍वाचे लक्ष लागलेले असते. दोन्‍ही देशातील क्रिकेट चाहत्‍या या सामन्‍यांसाठी वाटेल ती किंमत मोजयला तयार असतात. असेच काहीसे पाकिस्‍तानमधील एक फॅनचेही झाले.

भारत-पाकिस्‍तान सामना पाहण्‍यासाठी चक्‍क ट्रॅक्‍टर विकला

पाकिस्‍तानच्‍या एका क्रिकटे चाहत्‍याने रविवार ९ जून रोजी झालेल्‍या भारत-पाकिस्‍तान क्रिकेट सामना पाहण्‍यासाठी चक्‍क आपला ट्रॅक्‍टर तीन हजार डॉलरला विकला. त्‍याने ANI ला सांगितले की, "भारत विरुद्ध पाकिस्तान सामना पाहण्यासाठी मी माझा ट्रॅक्टर $3000 ला विकला. हा सामना पाकिस्‍तानने गमावला. त्‍यामुळे मी खूप निराश झालो. पण भारतीय क्रिकेट चाहत्‍यांनी मला खूप चांगले समर्थन दिले. त्‍यामुळे पुढील सामन्‍यासाठी मी भारताला समर्थन करण्‍याचे ठरवले.

सूर्यकुमारच्‍या खेळीने माझ्‍या ट्रॅक्‍टरचे पैसे वसुल झाले

पाकिस्‍तानबरोबरचा सामना गमावल्‍यानंतर मी सोमवारी अमेरिकेविरोधातील भारताचा सामना पाहण्‍यासाठी गेलो. मी पाकिस्‍तानची जर्सी घालून भारताचे समर्थन केले. या सामन्‍यात सूर्यकुमार यादवच्‍या अर्धशतकी खेळीने माझे मन जिंकले. मी पाकिस्‍तानचा सामना पाहण्‍यासाठी विकलेल्‍या ट्रॅक्‍टरचे पैसे सूर्यकुमारच्‍या खेळीने वसुल झाले, असे सांगत पाकिस्‍तानच्‍याल चाहत्‍याने टीम इंडियाच्‍या कामगिरीचे कौतूक केले.

भारत -अमेरिका सामन्‍यात काय झालं?

लो स्कोअरिंग सामने अंगावर शहारे आणणारे का असतात, याची उत्तम प्रचिती देणाऱ्या या रोमांचक लढतीत सौरभ नेत्रावळकरच्या सनसनाटी गोलंदाजीमुळे रंग भरलाच होता. मात्र, सूर्यकुमारने ४९ चेंडूंत नाबाद ५० तर दुबेने ३५ चेंडूंत नाबाद ३१ धावा जमवताना ६५ चेंडूंत ६७ धावांची अभेद्य भागीदारी साकारत अमेरिकेचा चक्रव्यूह भेदून दिला ! भारताने या हॅट्ट्रिक विजयासह विश्वचषकाच्या सुपर-८ फेरीतील स्थान आता निश्चित केले आहे.

सामन्‍यात भारताने टाॅस जिंकला. अमेरिकेला फलंदाजीसाठी निमंत्रण दिले. अमेरिकेला निर्धारित २० षटकांत ८ बाद ११० अशा किरकोळ धावसंख्येवर समाधान मानावे लागले. विजयासाठी १११ धावांचे तुलनेने किरकोळ आव्हान असताना रोहित शर्मा (६ चेंडूंत ३) व विराट कोहली (०) लागोपाठ बाद झाले होते. जम बसेल असे वाटत असतानाच ऋषभ पंत अली खानच्या खाली राहिलेल्या एका चेंडूवर त्रिफळाचीत झाला आणि यामुळे भारताची ७.३ षटकांत ३ बाद ४४ अशी आणखी बिकट स्थिती झाली. पण, याचवेळी सूर्यकुमार यादव व शिवम दुबे ही जोडी न्यूयॉर्कच्या प्रतिकूल खेळपट्टीवर एकत्रित आली.  कधी चौकार, कधी षटकार तर कधी एकेरी-दुहेरी धावांसह धावफलक सातत्याने हलता ठेवला.  सूर्यकुमार व दुबे यांनी अभेद्य अर्धशतकी भागीदारी साकारत भारताला हवाहवासा विजय मिळवून दिला.

सौरभ नेत्रावळकरची सनसनाटी गोलंदाजी

सौरभ नेत्रावळकरची सनसनाटी गोलंदाजी, प्रतिकूल खेळपट्टी, शेवटची ६ षटके बाकी असताना षटकामागे ८ पेक्षा अधिकची आवश्यक धावसरासरी, असा सारा माहोल विरोधात असताना सूर्यकुमार यादव व शिवम दुबे या धुरंधरांनी मात्र अक्षरशः सर्वस्व पणाला लावले आणि जणू अमेरिकेच्या जबड्यात हात घालत विजयाचा घास खेचून आणला ! भारतीय संघातर्फे अर्शदीप सिंगने ४ षटकांत ९ धावांत ४ बळी, असा भेदक मारा साकारला. याशिवाय हार्दिक पंड्याने ४ षटकांत १४ धावांत २ तर अक्षर पटेलने ३ षटकांत २५ धावांत १ बळी असे पृथक्करण नोंदवले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news