Siddheshwar Sugar Factory च्या निवडणुकीसाठी 136 जणांनी नेले अर्ज | पुढारी

Siddheshwar Sugar Factory च्या निवडणुकीसाठी 136 जणांनी नेले अर्ज

सोलापूर : पुढारी वृत्तसेवा

श्री सिद्धेश्वर सहकारी साखर कारखाना, कुमठेच्या (उत्तर सोलापूर) पंचवार्षिक निवडणुकीसाठी शुक्रवारपासून अर्ज विक्री सुरू झाली असून आतापर्यंत जवळपास 136 जणांनी उमेदवारी अर्ज नेल्याची माहिती जिल्हा उपनिबंधक तथा निवडणूक निर्णय अधिकारी कुंदन भोळे यांनी दिली आहे. (Siddheshwar Sugar Factory)

सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याची ही निवडणूक 20 संचालाकासाठी लागली आहे. त्यामध्ये ऊस उत्पादकांमधून 15, एससी, एसटी 2, महिला 2 व सोसायटी मतदार संघातून 1 असे 20 संचालक निवडून द्यायचे आहेत. त्यासाठी जवळपास 28 हजार 546 सभासद आहेत. यामध्ये अक्कलकोट, दक्षिण सोलापूर, उत्तर सोलापूर, मोहोळ, तुळजापूर, कर्नाटक राज्य व सोसायटी असे मतदार विखुरलेले आहेत.

शुक्रवारी अर्ज विक्री करण्याच्या पहिल्या दिवशी शुक्रवारी 55 जणांनी अर्ज नेले आहेत. त्यानंतर शनिवारी व रविवारी दोन दिवस शासकीय सुटी होती. सोमवारी एकाच दिवशी 81 जणांनी अर्ज नेेले आहेत. सोमवारी अर्ज घेऊन जाण्यासाठी सभासदांनी जिल्हा उपनिबंधक कार्यालयामध्ये गर्दी केली होती. तर काही सभासदांनी अर्जासोबत कोणती कागदपत्रे जोडावी लागतील याची माहिती कार्यालयाच्या भिंतीवर लावण्याची मागणी केली. त्या मागणीनुसार कार्यालयाच्या भिंतीवर उमेदवारांनी कोणती कागदपत्रे जोडावयाची आहेत, त्या माहितीचे पत्र लावण्याचे आश्वासन एस. डी. भंवर यांनी उमेदवारांना दिले. (Siddheshwar Sugar Factory)

उमेदवारी अर्ज नेण्यासाठी 2 डिसेंबरपर्यंत मुदत असणार आहे. त्यानंतर प्राप्त अर्ज प्रसिध्द करणे, 3 डिसेंबर रोजी अर्जाची छाननी, 6 रोजी अंतिम यादी प्रसिध्द करण, 6 ते 10 रोजी पर्यंत अर्ज मागे घेणे, 13 रोजी निवडणूक लढविणार्‍या उमेदवारांची अंतिम यादी प्रसिध्द करणे, 25 रोजी मतदान व मतमोजणी 26 रोजी होणार आहे. दरम्यान जेवढे संचालक निवडूनण द्यायचे आहेत, तितकेच अर्ज आले की, त्या उमेदवारांना विजयी घोषित केले जाणार आहे. मात्र इच्छुक उमेदवारांची संख्या वाढल्याने बिनविरोधची चर्चा असलेली सिध्देश्वर कारखान्याची निवडणूक तिरंगी होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

तालुकानिहाय मतदार असे…

सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत अक्कलकोट तालुक्यातील 9 हजार 167, दक्षिण सोलापूर 13 हजार 24, उत्तर सोलापूर 3 हजार 325, मोहोळ 1 हजार 574, तुळजापूर 1261, कर्नाटक राज्य 109, सोयायटी 86 सभासद असून एकूण 28 हजार 546 सभासद मतदारांना मतदान करण्याचा अधिकार आहे.

एकूण निवडून द्यावयाचे संचालक

ऊस उत्पादकांमधून 15
महिला 2
एससी, एसटी 2
सोसायटी 1
एकूण 20

हेही वाचा

Back to top button