सांगोला-पंढरपूर मार्गावर तिहेरी अपघातात दोघे ठार | पुढारी

सांगोला-पंढरपूर मार्गावर तिहेरी अपघातात दोघे ठार

पंढरपूर ; पुढारी वृत्तसेवा : सांगोला-पंढरपूर रस्त्यावर सोमवारी (दि. 29) सायंकाळी साडेचार वाजता मोटारसायकल, रिक्षा व चारचाकी गाडीचा समोरासमोर तिहेरी अपघात झाला. या अपघातात मोटारसायकलवरील शेतमजूर पती-पत्नी ठार झाले. याप्रकरणी सांगोला पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे.

सांगोला-पंढरपूर रस्त्यावर चंद्रमाला हॉटेलजवळ सायंकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास सांगोल्याहून पंढरपूरकडे चारचाकी गाडी (क्र. एम. एच. 02/बी. एस 8451)निघाली होती. त्या गाडीचे टायर अचानक पंक्‍चर झाल्याने चालकाचा ताबा सुटला. गाडी पंढरपूरच्या दिशेने जाणार्‍या रिक्षाला (क्र. एम. एच. 13 सी . टी . 6298) धडकत होती. त्यामुळे रिक्षाचालकाने त्या गाडीला ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला.

त्याचवेळी पाचीपट्टा येथील शेतकर्‍यांच्या शेतात काम बघण्यासाठी शेतमजूर ज्ञानदेव भिसे (वय 45) व त्यांच्या पत्नी बबिता ज्ञानदेव भिसे (वय 40, रा. फणेपूर, ता. लोहारा, जि. उस्मानाबाद) हे दुचाकी (क्र. एम. एच./बी. जे. 7598) वरून घराकडे जात होते. अचानक समोरून आलेल्या रिक्षा व गाडी ने भिसे यांच्या गाडीला जोरदार धडक दिली.

अपघात इतका भीषण होता की, दुचाकीवरील भिसे दाम्पत्य रक्‍तबंबाळ होऊन कोसळले. अपघातात इर्टीका गाडीचा पुढील भाग चेंदामेंदा झाला आहे. तर दुचाकीची इतकी भीषण धडक झाली की, दुचाकीचे दोन तुकडे झाले आहेत.

अपघातानंतर रिक्षा चालक रिक्षा घेऊन पंढरपूरकडे चालला होता. त्याला बामणीजवळ ग्रामस्थांनी पाठलाग करून पकडले. या अपघाताची नोंद सांगोला पोलिस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत झालेली नव्हती. अपघातातील मृत पती-पत्नीवर शवविच्छेदन करण्यासाठी ग्रामीण रुग्णालय सांगोला येथे शवविच्छेदन कक्षामध्ये ठेवण्यात आले आहे. भिसे यांना दोन मुली व एक मुलगा लहान आहे. आई-वडिलांच्या मृत्युमुळे मुले अनाथ झाली आहेत. त्याबद्दल हळहळ व्यक्त केली जात आहे.

Back to top button