सोलापूर : कागदी बंडल देऊन 20 हजारांचे दागिने लंपास | पुढारी

सोलापूर : कागदी बंडल देऊन 20 हजारांचे दागिने लंपास

सोलापूर : पुढारी वृत्तसेवा

गुलबर्ग्याला जाण्याचा बहाणा करून व दोन लाख रुपयांचे बंडल घेऊन दागिने द्या, असे म्हणून 20 हजार रुपयांचे दागिने घेऊन पोबारा केल्याची घटना शनिवारी सात रस्ता परिसरात घडली. उमा सीताराम बक्कीवाले यांच्या फिर्यादीनुसार अनोळखी दोन व्यक्तींवर गुन्हा दाखल झाला आहे.

उमा सीताराम बक्कीवाले (वय 35, उत्तर सदर बझार, नळ बझार चौक, बालाजी मंदिर समोर, सोलापूर) या थांबल्या असताना एका लहान मुलाने त्यांच्याकडे भूक लागल्याचे सांगत पैशाची मागणी केली. त्यांनी त्याला पैसे दिले. यानंतर त्याने त्याच्या भावालाही भूक लागली आहे, असे सांगत त्यांना भावाकडे घेऊन गेला.

तेव्हा त्याच्या भावाने फिर्यादीला गुलबर्गा येथे जाण्याचा पत्ता विचाला. त्यानंतर मोठ्या भावाने आपल्या लहान भावाकडे दोन लाख रुपये आहेत. त्यातील माझ्या व त्याच्या वाट्याला एक एक लाख येतात. ते तुम्ही घ्या, आणि त्याला तुमच्याकडील सोने द्या. त्याला गुलबर्गा येथे जाताना धोका नको.

तसेच तुम्हाला मिळालेल्या एक लाखातून तुम्ही तुमचे सोने घ्या, असे अमिष दाखवले. या अमिषाला बळी पडून उमा बक्कीवाले यांनी त्याला सहमती दिली. क्षणाचाही विचार न करता त्यातील लहान मुलाने खिशातून कापडी पिशवी काढली. त्यातील मोठा बंडल फिर्यादीकडे दिला.

या मोबदल्यात आठ हजारांचे कानातील फूल व 12 हजारांचे तीन ग्रॅम वजनाचे मंगळसूत्र असे 20 हजारांचे दागिने घेऊन त्याने फिर्यादीला पैसे मोजण्यास सांगितले. फिर्यादीने पैसे मोजावे म्हणून बंडल घेतले. 50 रूपयांच्या नोटेचे बंडल त्यांनी प्रथम मोजण्यास सुरवात केली. पण बंडलातील पहिलीच नोट 50 होती उर्वरित नोटांच्या आकाराचे कागद घातले होते.

सर्वच बंडल तसे असल्याचे निदर्शनास असल्याचे लक्षात येताच त्यांनी त्या दोघांची चौकशी केली असता ते दोन्ही भामटे पसार झाले. आपली फसवणूक झाल्याची खात्री झाल्यानंतर उमा बक्कीवाले यांनी सदर बझार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा तपास पोसई बेंबडे करीत आहेत.

Back to top button