सांगली : जतमध्ये मित्र पक्षाने काय केले ते सांगावे - पुढारी

सांगली : जतमध्ये मित्र पक्षाने काय केले ते सांगावे

सांगली : पुढारी वृत्तसेवा : काँग्रेस पक्ष नेहमीच आघाडी धर्म पाळत आला आहे. आम्ही नेहमीच आघाडीवर विश्वास ठेवून काम करतो. परंतु त्याचवेळी मित्र पक्षाकडून त्याचे पालन होत नाही. आमच्यावर टीका करण्यापेक्षा त्यांच्या पक्षाने जतमध्ये माझ्या पराभवासाठी काय केले ते सांगावे, असे प्रत्युत्तर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष व आमदार विक्रमसिंह सावंत यांनी पत्रकार परिषदेत दिले.

यावेळी काँग्रेसचे जिल्हा प्रभारी तथा प्रदेश सरचिटणीस संजय बालगुडे म्हणाले, अखिल भारतील काँग्रेस आणि प्रदेश काँग्रेसच्या सूचनेनुसार राज्यात महागाई विरोधात जनजागरण अभियान सुरू आहे. केंद्रातील भाजप सरकारने पेट्रोल-डिझेलच्या किंमती भरमसाठ वाढवल्या आहेत.

मोदी सरकारच्या काळात देशातील अर्थव्यवस्था पूर्णपणे ढासळली आहे. यापूर्वी प्रत्येक कुटुंबाची घरगुती बचत ही 25 टक्केपर्यंत होती. महागाईमुळे हे प्रमाण सध्या 13 टक्केपर्यंत आले आहे. केंद्रातील धोरण शेतकरी विरोधी आहे. शेतकर्‍यांऐवजी उद्योजकांचे कर्ज ते माफ करत आहेत.

आज महागाईमुळे सामान्य माणसाचे जगणे मुश्किल बनले आहे. त्यामुळेच जनजागृतीसाठी अभियान सुरू केले आहे.
ते पुढे म्हणाले, प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांनी आगामी निवडणुका स्वबळावर लढण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यामुळे काँग्रेस पक्षसंघटन अधिक मजबूत केले जाईल.

प्रत्येक बूथ कमिट्या सक्षम केल्या जातील. त्यासाठी प्रत्येक तालुकाध्यक्षांना सूचना दिल्या जातील. प्रत्येक बूथ कमिट्यावरील कार्यकर्त्यांना ताकद दिली जाईल. त्यांच्यामार्फत मतदारांवर नियंत्रण ठेवले जाईल. काँग्रेसचे जिल्हा सहप्रभारी अभय साळुंखे (लातूर), काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार विक्रम सावंत, शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील, जि. प. सदस्य जितेंद्र पाटील, नंदकुमार कुंभार, नामदेवराव मोहिते उपस्थित होते.

 

Back to top button