कोल्हापूर : जिल्हा बँकेसाठी जोडण्या सुरू | पुढारी

कोल्हापूर : जिल्हा बँकेसाठी जोडण्या सुरू

कोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा

विधान परिषदेची निवडणूक झाल्याच्या दुसर्‍या दिवसापासून जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी नेत्यांच्या जोडण्या सुरू झाल्या आहेत. जिल्ह्यातील काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना व जनसुराज्य शक्ती पक्षाच्या नेत्यांची जिल्हा बँकेमध्ये शनिवारी सायंकाळी बैठक झाली. यामध्ये आ. प्रकाश आवाडे व माजी आ. महादेवराव महाडिक यांच्याशी चर्चा करण्याची जबाबदारी आ. पी. एन. पाटील व आ. विनय कोरे यांच्यावर सोपविण्याचा निर्णय घेण्यात आला.

उमेदवारी अर्जांची छाननी झाल्यानंतरच चर्चेला गती येणार आहे. दरम्यान, बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना बँकेचे अध्यक्ष ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी जिल्हा बँकेची निवडणूक बिनविरोध होणे शक्य नसल्याचा पुनरुच्चार केला.

जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने चर्चा करण्यासाठी बँकेचे अध्यक्ष मंत्री मुश्रीफ यांनी शनिवारी बैठक बोलाविली होती. बैठकीस मंत्री मुश्रीफ यांच्यासह पालकमंत्री सतेज पाटील, आ. पी. एन. पाटील, आ. विनय कोरे, खा. संजय मंडलिक आदी उपस्थित होते. शिवसेनेच्या पदाधिकार्‍यांशी चर्चा करण्याची जबाबदारी खा. संजय मंडलिक यांच्यावर सोपविण्यात आली.

बैठकीनंतर माहिती देताना मंत्री मुश्रीफ म्हणाले, प्राथमिक चर्चा करण्यासाठी आज बैठक घेण्यात आली. काही जागांची निवड बिनविरोध होईल, परंतू संपूर्ण निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता कमी आहे. उमेदवारी अर्जाच्या छाननीनंतर पुन्हा एकदा बैठक घेण्यात येणार आहे. दरम्यानच्या काळात आ. आवाडे व महाडिक यांच्याशी आ. पी. एन. पाटील व आ. कोरे यांनी चर्चा करावी, असे ठरविण्यात आले.
जिल्हा बँकेची निवडणूक सामोपचाराने करण्याच्यादृष्टिने आजच्या बैठकीत चर्चा करण्यात आल्याचे आ. कोरे यांनी सांगितले.

पक्षीय बलाबल

राष्ट्रवादी……. 8
काँग्रेस……….6
जनसुराज्य……2
शिवसेना……..1
भाजप………..1
अपक्ष………..3

राष्ट्रवादीची आज बैठक

जिल्हा बँकेच्या निवडणुकीसंदर्भात रविवारी (दि. 28) सायंकाळी साडेपाच वाजता राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची बैठक बोलाविण्यात आली असल्याचे मंत्री मुश्रीफ यांनी सांगितले.

उद्यापासून उमेदवारी अर्ज भरण्यास प्रारंभ

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीसाठी सोमवार, दि. 29 पासून उमेदवारी अर्ज विक्री व भरण्यास प्रारंभ होत आहे. सकाळी 11 ते दुपारी 3 वाजेपर्यंत जिल्हा बँकेत अर्ज स्वीकारण्यात येतील. उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत 3 डिसेंबरपर्यंत आहे.
उच्च न्यायालयाने तातडीने जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची निवडणूक घेण्याचा आदेश दिला. त्यानुसार 5 जानेवारी रोजी जिल्हा बँकेची निवडणूक होत आहे. 6 डिसेंबर रोजी छाननी होणार आहे. 7 डिसेंबर रोजी उमेदवारांची यादी प्रसिद्ध करण्यात येणार. त्यानंतर
21 डिसेंबरपर्यंत माघारीची मुदत आहे.

हेही वाचलं का?

Back to top button