राष्ट्रवादीची पदाधिकारी बदलाची रणनिती फायद्याची ? | पुढारी

राष्ट्रवादीची पदाधिकारी बदलाची रणनिती फायद्याची ?

पिंपरी : मिलिंद कांबळे

पिंपरी-चिंचवड महापालिकेची सत्ता पुन्हा काबीज करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने ऐन निवडणुकीच्या तोंडावर पक्षाच्या प्रमुख पदाधिकार्‍यांचे राजीनामे घेण्याचा निर्णय घेतला आहे. नव्या चेहर्‍यांना संधी देऊन निवडणुकीत आक्रमक भूमिका घेण्याची रणनिती आखली आहे. त्यातून पक्षाचा किती फायदा होतो, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

पिकपाणी : शेवग्याची शेती कशी करावी?

महापालिकेची निवडणूक त्रिसदस्यीय प्रभागरचनेनुसार फेबु्रवारी 2022 मध्ये होणार आहे. त्यासाठी केवळ दोन महिन्यांचा कालावधी शिल्लक आहे. महापालिकेकडून प्रभागरचनेचे काम अंतिम टप्पात आले आहे. निवडणूक अगदी तोंडावर आलेली असताना राज्यात महाविकास आघाडीत प्रमुख असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसने शहराध्यक्षांसह महिला व युवक शहराध्यक्षांचे राजीनामे मागितले आहेत. त्यामुळे राजकीय क्षेत्रात खळबळ माजली आहे. त्यांच्या जागी नव्या चेहर्‍यांना संधी दिली जाणार आहे. अचानक घडलेल्या या कृतीवरून शहरात उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे.

कोरोनाच्या नव्या व्हेरियंटमुळे राज्य सरकार ‘ॲक्शन मोड’मध्ये

तब्बल 15 वर्षे सत्तेत असलेल्या राष्ट्रवादीला फेब्रुवारी 2017 ला सत्तेतून पायउतार व्हावे लागले. भ्रष्टाचारावर रान पेटवत तसेच, राष्ट्रवादीचे नगरसेवक फोडत भाजपने सत्ता काबीज केली. त्यामुळे पक्षात आलेली मरगळ दूर करण्यासाठी वेगवेगळे फंडे वापरले गेले; मात्र त्याचा फारसा लाभ झाला नाही. महाविकास आघाडीच्या माध्यमातून राज्यात राष्ट्रवादी सत्तेत आल्याने शहरात पक्षाला बळकटी मिळाली. पालिकेतील भ्रष्टाचारावरून भाजप कारभार्‍यांना घेरण्याच्या आक्रमक भूमिका पक्षाने घेतली. त्यात पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी दोन दिवस शहरात ठाण मांडून मॅरेथॉन बैठक घेत आजी व माजी नगरसेवक व पदाधिकार्‍यांशी संवाद साधला. सर्वांची मते जाणून घेऊन भाजपवर हल्लाबोल करण्याचा संदेश त्यांनी दिला. त्यामुळे पदाधिकारी व कार्यकर्त्यांना ऊर्जा मिळाली.

कोरोनाचा नवा व्‍हेरियंट : राज्‍य सरकारचे नवे नियम

मात्र, अचानक प्रमुख पदाधिकार्‍यांचे राजीनामे घेण्याचे कृती राजकीय विश्लेषकांना बुचकळ्यात टाकणारी ठरली आहे. निवडणुकीची लगीनघाई सुरू असताना पक्षाचा कर्णधार बदलून संपूर्ण शहराची नव्याने घडी बसविण्याची रणनिती सद्यपरिस्थितीत काहीशी अवघड व अडथळ्याची शर्यत वाटत आहे. पक्षातील असंख्य गटतटाला बाजूला सारून नवी उभारी देण्यासाठी तसेच, सत्ताधारी भाजपला सक्षम पर्याय निर्माण करण्याची नव्या नेतृत्वासमोर आव्हान असणार आहे. राष्ट्रवादीच्या नेत्यांनी महापालिका युद्धाच्या तोंडावर दिलेले हे धक्कातंत्र पक्षाला किती फायद्याचे ठरणार आहे. त्याबाबत उत्सुकता आहे.

 

अजित पवार जो निर्णय घेतील तो मान्य.

पिंपरी-चिंचवड शहरात राष्ट्रवादी काँग्रेससंदर्भात पक्षाचे सर्वेसर्वा अजित पवार हे जे काही निर्णय घेतील. तो आम्हांला मान्य आहे. पक्षाच्या निर्णयानुसार काम करण्यास आम्ही सदैव तयार आहोत, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे यांनी ’पुढारी’ला सांगितले. वाघेरे हे तब्बल 6 वर्षांपासून शहराध्यक्षपद भूषवित आहेत.

कोण असणार राष्ट्रवादीचा कर्णधार ?

पिंपरी-चिंचवड शहरावर विशेष मर्जी असलेले राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पक्षाचे सर्वेसर्वा अजित पवार हे शहराध्यक्षपदी म्हणजे कर्णधारपदी कोणाची नियुक्ती करतात, याकडे राजकीय जाणकारांचे लक्ष लागले आहे. तसेच, युवक व महिला आघाडी शहराध्यक्षपदी कोणाची वर्णी लागते, त्यावरून चर्चा झडत आहेत. गाववाले व बाहेरचे तसेच, नातेगोते यांचा विचार करूनच पदाधिकारी निवडला जाईल, असे सुत्रांनी सांगितले.

Back to top button