ओबीसींच्या 72 जागा रद्द | पुढारी

ओबीसींच्या 72 जागा रद्द

कोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा

जिल्ह्यातील 134 ग्रामपंचायतींमधील 194 जागांसाठी होणार्‍या पोटनिवडणुकीत नागरिकांचा मागास प्रवर्गाच्या (ओबीसी) 72 जागा अतिरिक्त ठरल्या आहेत. या जागा रद्द करण्यात आल्या असून त्या सर्वसाधारण प्रवर्गाला (खुला व महिला) आरक्षित करण्यात आल्या आहेत.

ओबींसीचे राजकीय आरक्षण न्यायालयाने रद्द केल्यानंतर शासनाने अध्यादेश काढून स्थानिक स्वराज्य संस्थेसाठी नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी 27 टक्के आरक्षण निश्चित केले आहे. त्यानुसार अतिरिक्त होणार्‍या ओबीसी प्रवर्गातील जागा रद्द करून, त्या सर्वसाधारण प्रवर्गाला देण्याचा आदेश राज्य निवडणूक आयोगाने सर्व जिल्हाधिकार्‍यांना दिला होता. या आदेशाची अंमलबजावणी जिल्ह्यात होणार्‍या ग्रामपंचायतींच्या पोटनिवडणुकीसाठी करण्यात आली आहे.

त्यानुसार बारा तालुक्यांतील 72 ग्रामपंचायतींतील पोट निवडणुकीसाठी रिक्त असलेल्या नागरिकांच्या मागास प्रवर्गातील 72 जागा रद्द करून त्या सर्वसाधारण पुरुष आणि महिला प्रवर्गासाठी आरक्षित करण्यात आल्या. सर्वाधिक 25 जागा चंदगड तालुक्यात अतिरिक्त ठरल्या आहेत.

रद्द केलेल्यापैकी 31 जागा सर्वसाधारण प्रवर्गासाठी खुल्या आहेत. 41 जागा सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी आरक्षित राहिल्या आहेत. आजरा तालुक्यातील पाचही जागा सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी राखीव झाल्या आहेत. कागलमध्ये एकाच ग्रामपंचायतील एक जागा अतिरिक्त ठरली, तीही जागा महिलांसाठी राखीव झाली आहे. गडहिंग्लजमध्ये 4 जागा महिलांसाठी, तर 3 जागा सर्वसाधारण खुल्या प्रवर्गासाठी राखीव झाल्या आहेत.

भुदरगडमध्ये पाच सर्वसाधारण, तर एक जागा सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी राखीव झाली आहे. हातकणंगले तालुक्यातील 5 ग्रामपंचायतीतील पाच जागा अतिरिक्त ठरल्या. त्यातील 3 जागा महिलांसाठी, तर दोन जागा सर्वसाधारण प्रवर्गासाठी राखीव झाल्या. पन्हाळ्यात एक खुल्या तर दोन सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी राखीव झाल्या.

राधानगरीत 1 महिलांसाठी तर 3 सर्वसाधारण प्रवर्गासाठी आरक्षित झाल्या आहेत. गगनबावड्यात दोन ठिकाणी आरक्षण बदलले. त्यात एक महिलांसाठी, तर एक सर्वसाधारण खुल्या प्रवर्गासाठी जागा देण्यात आल्या. शिरोळमध्ये एक महिला आणि एक खुल्या प्रवर्गासाठी, शाहूवाडीत 4 महिला आणि एक खुल्या प्रवर्गासाठी, करवीरमध्ये 2 महिला आणि 5 खुल्या प्रवर्गासाठी, तर चंदगडमधील 16 महिलांसाठी तर 9 जागा सर्वसाधारण खुल्या प्रवर्गासाठी आरक्षित झाल्या.

खुल्या प्रवर्गातून कोणालाही निवडणूक लढवता येणार

नागरिकांच्या मागास प्रवर्गाच्या अतिरिक्त झालेल्या जागा रद्द करून त्या सर्वसाधारण आणि सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी आरक्षित झाल्या आहेत. मात्र, सर्वसाधारण प्रवर्गातून कोणत्याही प्रवर्गातील आणि महिला व पुरुष यांना निवडणूक लढवता येणार आहे. सर्वसाधारण महिला प्रवर्गातून कोणत्याही प्रवर्गातील महिला उमेदवाराला निवडणूक लढवता येईल.

Back to top button