नाशिक (सिडको) : पुढारी वृत्तसेवा
लोकसंख्येवर आधारित नवीन पोलिस ठाण्याची निर्मिती करण्यात येणार असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सातपूर पोलिस ठाण्याच्या नवीन इमारत लोकार्पणप्रसंगी सांगितले. वाढती लोकसंख्या व वाढती गुन्हेगारी पाहता अंबड पोलिस ठाण्याचे विभाजन करून अंबड औद्योगिक वसाहतीत चुंचाळे परिसरासाठी स्वतंत्र पोलिस ठाणे निर्मितीची गरज दैनिक पुढारीत प्रसिद्ध झालेल्या वृत्ताची फडणवीस यांनी दखल घेतली. मुख्यमंत्र्यांच्या घोषणेचे उद्योजक व नागरिकांनी स्वागत करताना पोलिस खात्याने आता तत्काळ कार्यवाही करण्याची मागणी केली आहे.
आमदार सीमा हिरे यांच्या निधीतून पाच कोटी रुपये खर्च करून तयार करण्यात आलेल्या सातपूर पोलिस ठाण्याच्या प्रशस्त नवीन इमारत लोकार्पणप्रसंगी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही महत्त्वपूर्ण घोषणा केली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोलिस ठाण्याच्या प्रशस्त नवीन इमारतीच्या लोकार्पणानंतर भाषणात त्यांनी भविष्यात नवीन पोलिस ठाणे निर्मिती कशा प्रकारे केली जाणार आहे, याची माहिती दिली.
वाढती लोकसंख्या : वाढती गुन्हेगारी
अंबडगाव, अंबड औद्योगिक वसाहत, चुंचाळे, दत्तनगर, घरकुल आदी परिसरातीत लोकसंख्या प्रचंड प्रमाणात वाढली असून, गुन्हेगारीही वाढली आहे. शनिवारी रात्री चुंचाळे घरकुल परिसरात खुनाची घटना झाली आहे. अंबड औद्योगिक वसाहतीलगत चुंचाळे, दत्तनगर, संजीवनगर, अंबड लिंक रोड परिसरात दिवसेंदिवस हाणामाऱ्या, कामगारांची लूट, सोनसाखळी चोरी, मोबाइल, पैसे हिसकावून घेणे, धमकी, मारहाणीसाखे प्रकार नित्याचेच झाले आहेत.
नवीन पोलिस ठाणे निर्मितीसाठी सामाजिक कार्यकर्ते साहेबराव दातीर, माजी नगरसेवक राकेश दोंदे व रामदास दातीर यांनी परिसरात स्वाक्षरी मोहीम राबवून सुमारे वीस हजार नागरिकांच्या स्वाक्षऱ्या घेतल्या होत्या. तसेच या मागणीसाठी साहेबराव दातीर यांनी स्थानिक नागरिकांसह अंबड गाव ते मुंबई मोर्चा काढला होता. त्यावेळी आमदार सीमा हिरे यांनी मध्यस्थी करून पालकमंत्री दादा भुसे यांच्या समवेत जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेऊन गृहमंत्रालयाकडे दिलेल्या प्रस्तावातील त्रुटी पूर्ण करून पाठविण्यासाठी तत्कालीन पोलिस आयुक्तांना सांगितले होते. तसेच या मागणीसाठी परिसरात चौक सभा झाल्यानंतर तत्कालीन पोलिस आयुक्तांनी स्वतंत्र पोलिस ठाण्याऐवजी स्वतंत्र पोलिस चौकीची निर्मिती केलेली आहे.