जत : उटगीत भरदिवसा घरफोडी; दीड लाखांची चोरी | पुढारी

जत : उटगीत भरदिवसा घरफोडी; दीड लाखांची चोरी

जत, पुढारी वृत्तसेवा

उटगी (ता. जत ) येथे चौंडीकर वस्तीत एका राहत्या घरी कोणी नसल्याचे पाहून पाळत ठेवून घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी  सोन्याचे दागिने व रोख रक्कमेसह दीड लाख रुपयांचा ऐवज लंपास केला आहे.

ही घटना गुरुवारी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास घडली आहे. याबाबतची फिर्याद श्रीशैल इराप्पा बासरगाव यांनी उमदी पोलिसांत दिली आहे.

घटनास्थळावरून व पोलिसांनी दिलेली माहिती अशी, श्रीशैल बासरगाव यांचे उटगी येथील चौंडीकर वस्ती येथे राहते घर आहे. गुरुवारी घरातील कुटुंबातील सर्वजण शेतातील कामासाठी शेतात गेले होते. बासरगाव यांच्या घरी कोणी नसल्याचे पाहून अज्ञात चोरट्यांनी घरातील सोन्याचे दागिने व चांदीचे दागिने यांची चोरी केली आहे.

या दागिन्यांची ७० हजार किंमत होती. तर रोख रक्कम ८० हजार रुपये इतकी रक्कम चोरीस गेली आहे.असे एकूण दीड लाखाचा ऐवज चोरीस गेला आहे. घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी रत्नाकर नवले, सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज पवार यांनी भेट दिली.

तपास गतीने करण्याच्या सूचना तपासी अधिकारी यांना देण्यात आल्या. या घटनेचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक शिंदे करीत आहेत.

Back to top button