सातारा : बिबट्याचे हल्ले अन् सुस्त वन विभाग! | पुढारी

सातारा : बिबट्याचे हल्ले अन् सुस्त वन विभाग!

कराड : पुढारी वृत्तसेवा

कराडसह पाटण तालुक्याच्या डोंगरी विभागामध्ये बिबट्याचा वावर वाढला आहे. सिमेंटच्या जंगलातही बिबट्याचे दर्शन वारंवार होत असल्याच्या घटना घडू लागल्या आहेत. त्यातच पाळीव प्राण्यांबरोबरच लहान मुले व माणसांवर बिबट्याने हल्ला केल्याच्या घटना घडू लागले आहेत. मात्र, याबाबत वन विभाग सुस्त असल्याचे दिसून येत आहे.

डोंगरी विभागात शेती असलेल्या शेतकर्‍यांसह त्रस्त लोकांकडून पिंजरा लावून बिबट्याला पकडण्याची मागणी केली जात असली तरी वन विभाग त्या बाबत गांभीर्याने घेत नसल्याचा आरोप लोकांकडून केला जात आहे. कराड तालुक्यातील येणके येथे चार वर्षांच्या चिमुरड्यावर बिबट्याने हल्ला करून त्याच्या नरडीचा घोट घेतला.

त्यामुळे लोकांनी आक्रमक होत वनविभागाच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त केली आहे. जंगलांमध्ये वावरणारा बिबट्या गेल्या काही वर्षांपासून सिमेंटच्या जंगलांमध्येही राजरोसपणे फिरत आहे. काही वर्षांपूर्वी कराडमध्ये मुक्तपणे फिरणार्‍या बिबट्याने सिटीपोस्टजवळ काही लोकांवर हल्ला केला होता. यावेळेला बिबट्याला पकडताना पोलिसांनी त्याच्यावर केलेल्या गोळीबारात बिबट्या ठार झाला होता.

त्यावरून पोलिस व वन विभाग यांच्यात अधिकारावरून शाब्दिक कोट्या झाल्या होत्या. या घटनेनंतर बिबट्या मलकापूर, आगाशिवनगर परिसरासह विंग, नांदलापूर, चचेगाव, जखिणवाडी, शिंदेवाडी आदी परिसरात वारंवार दिसू लागला. तशाच प्रकारे कोळेवाडी, तांबवे, पाठरवाडी, कासार शिरंबे, वाहगाव, तळबीड, वराडे येथे तसेच डोंगराकडेच्या नागरीवस्तीमध्येही बिबट्याचे दर्शन होऊ लागले.

एवढेच काय आगाशिवनगर परिसरात डोंगर पायथ्याला असलेल्या बंगल्यांच्या परिसरात बिबट्या मुक्तसंचार करत असल्याचे अनेक वेळा सीसीटीव्ही कॅमेर्‍याच्या माध्यमातून स्पष्ट झाले आहे. हे करत असताना बिबट्या कधी एकटा तर कधी पिलांसोबत दिसल्याचे सीसीटीव्हीत कैद झाले आहे.त्यामुळे सिमेंटच्या जंगलाबरोबरच लोकांचा वावर असलेल्या शेती शिवारामध्ये बिबट्याचे वारंवार दर्शन होत असल्याने लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.

त्यातच अनेक वेळा बिबट्याने शेतकर्‍यांच्या शेळ्या, कुत्री, पाळीव जनावरे, वानरांवर हल्ला करून ठार केली आहेत. गेली अनेक दिवसांपासून पाळीव प्राण्यांवरील बिबट्याचे हल्ले हे सत्र सुरूच आहे. याबाबत अनेक वेळा शेतकर्‍यांनी वनविभागाशी संपर्क करून बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी केली. मात्र, वन विभागाने या मागणीकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप लोकांमधून केला जात आहे.

अनेक वेळा वन विभागाच्या अधिकार्‍यांनी शेतकर्‍यांना झालेल्या नुकसानीची भरपाई देण्यासाठी प्रयत्न केले तर काही वेळा भरपाईही मिळवून दिली. त्याचबरोबर वन विभागाच्या अधिकार्‍यांनी मानवी वस्तीजवळ वावरणार्‍या बिबट्याचा वेळीच बंदोबस्त केला असता तर काही घटना टाळता आल्या असत्या. परंतु, वन विभागाच्या चालढकल भूमिकेमुळे एका चिमुरड्याचा जीव गेल्याच्या संतप्त प्रतिक्रिया लोकांमधून व्यक्त केल्या जात आहेत.

बिबट्याने काही दिवसांपूर्वी उंडाळे रस्त्यावर रात्रीच्या वेळेला दुचाकी वर हल्ला केल्याचे घटना घडली होती. तर त्यानंतर एका महिलेवरही बिबट्याने हल्ला केला होता.या घटना ताज्या असतानाच जानेवारीमध्ये महामार्गावरच बिबट्याने ठिय्या मांडला होता. तर शिंदेवाडी येथे कुत्र्याची शिकार केली होती.

ऑगस्टमध्ये नांदलापूर येथे जाळीमध्ये ठेवलेल्या शेळीच्या पिलांवर बिबट्याने हल्ला केला होता. यामध्ये अकरा पिलांपैकी पाच पिल्ले गायब तर सहा पिल्लांची बिबट्याने नरडी फोडली होती. या व अशा अनेक घटना वारंवार घडत असताना वन विभागाने ही बाब गांभीर्याने घेतल्याचे दिसून येत नाही.

त्यामुळे बिबट्याचे लहान मुले व माणसांवरील हल्ल्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत गेले. एखाद्या ठिकाणी किरकोळ घटना घडल्यानंतर वन विभागाने वेळीच सावधानता बाळगून बिबट्याचा बंदोबस्त केला असता तर आज घडलेली घटना किंवा अशा स्वरूपाच्या अनेक घटना टाळता आल्या असता. परंतु, वन विभागाच्या हलगर्जीपणामुळेच बिबट्याचे हल्ले वाढले आहेत. वेळीच बिबट्याचा बंदोबस्त न केल्यास लोकांना शेती शिवारात फिरणे अवघड होईल.

तरी या बाबत दक्ष राहून वन विभागाने बिबट्याचा बंदोबस्त करावा. वारंवार माणसांवर होणारे बिबट्याचे हल्ले रोखण्यासाठी प्रयत्न करावेत, अन्यथा शेती शिवारामध्ये जाणे शेतकर्‍यांना अवघड होईल.

तांबवेत झाला होता बालकावर हल्ला

सप्टेंबर महिन्यात तांबवे येथे जनावरांच्या शेडजवळ बिबट्याचा मुक्त वावर असल्याचे दिसून आले होते. त्यानंतर चार दिवसांत दक्षिण तांबवे येथे भुंडाचा माळ नावच्या शिवारात डोंगराकडेला बांधलेली गाय आणण्यासाठी गेलेल्या 8 वर्षांच्या मुलावर बिबट्याने हल्ला केला होता. परंतु, मुलांच्या ओरडण्याने त्यावेळेला बिबट्याने तेथून धूम ठोकली होती. मात्र संबंधित मुलाच्या अंगावर बिबट्याच्या नाख्यांचे ओरखडे स्पष्ट दिसत होते. यावेळी लोकांनी बिबट्याच्या बंदोबस्ताची मागणी केली होती.

बिबट्या हवा की माणूस..?

कराड तालुक्यात तांबवे, किरपे, आगाशिव डोंगर, जखिणवाडी, वहागाव आदी ठिकाणी बिबट्याचे पाळीव जनावरांवर हल्ले चढवून शेतकर्‍यांचे पशुधन धोक्यात आणले आहे. आता तर बिबट्या लोकवस्तीत शिरला आहे. सोमवारी सकाळी तर त्याने येणके येथे चार वर्षांच्या ऊस तोड मजूर मुलावर हल्ला करून त्याला ठार केले. या घटनेने खळबळ उडाली आहे. दरम्यान, बिबट्याच्या हल्ल्यांकडे दुर्लक्ष करणार्‍या वन विभागाला बिबट्या हवा की, माणूस असा प्रश्न संतप्त ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे.

कराड तालुक्यात पाळीव जनावरांवरील हल्ल्याच्या घटनांमध्ये गेल्या काही महिन्यांत वाढ झाली आहे. बिबट्या लोकवस्तीत शिरून पाळीव कुत्री, शेळ्या, म्हैशी यांना ठार करत आहे.रात्रीच्या वेळी काहींच्या तर घरात बिबट्या शिरल्याच्या घटना घडल्या आहेत. बिबट्यांची संख्या किती याची आकडेवारी वन विभागाकडे उपलब्ध नाही हे विशेष.

पाळीव जनावरांवर हल्ल्यात शेतकर्‍यांचे पशुधन धोक्यात आले आहे. असे असताना हाताच्या बोटावर मोजण्या इतक्याच शेकर्‍यांना नुकसान भरपाई वन विभागाने दिली आहे. शासकीय नियम, निकषात नुकसान भरपाई शेतकर्‍यांना मिळतच नाही. अन्नाच्या शोधात बिबट्या लोकवस्तीत येत आहे, असा निर्वाळा वन विभागाचे अधिकारी देतात. पण, बिबट्याला पकडण्यासाठी कोणत्याच उपाययोजना त्यांच्याकडून होताना दिसत नाहीत.

ज्या-ज्या ठिकाणी बिबट्याचा उपद्रव वाढला आहे त्या जखिणवाडी, येणके, किरपे, वहागाव या ठिकाणी ग्रामस्थांनी वारंवार मागणी करूनही सापळा लावण्यास वन विभागाचे कर्मचारी टाळाटाळ करत आहेत. शेतकर्‍यांच्या तक्रारीकडेही या विभागाचे लक्ष नसते.

आता तर चार वर्षांच्या बालकावर बिबट्याने हल्ला करून त्याला ठार केले आहे. त्यामुळे वनकर्मचार्‍यांना बिबट्या हवा माणूस असा संतप्त सवाल ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे. बिबट्यांचा बंदोबस्त करण्यास हा विभाग अपयशी ठरल्याने ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला आहे.

‘आगाशिवा’वर बिबट्याची दहशत

 

कराडपासून हाकेच्या अंतरावर असणार्‍या ऐतिहासिक आगाशिव डोंगर परिसरात मागील काही वर्षांपासून सातत्याने बिबट्याच्या कळपाचे दर्शन होते. त्यामुळेच मलकापूरमधील वन विभागाच्या कार्यालयापासून पायरी मार्गाने आगाशिव मंदिराकडे व्यायामासाठी जाणार्‍या नागरिकांची संख्या लक्षणीयरित्या कमी झाली आहे. बिबट्याच्या डरकाळीमुळे अनेकांनी आगाशिव डोंगराकडेच पाठ फिरवल्याचे पहावयास मिळते.

आगाशिव डोंगर रांग परिसरात ऐतिहासिक बौद्धकालीन लेण्यांसह घनदाट जंगल आहे. धोंडेवाडीपासून घारेवाडी बाजूलाही एक डोंगर रांग जाते. एका बाजूला विंग, शिंदेवाडी तर दुसर्‍या बाजूला ओेंडसह परिसरातील गावे येतात. या संपूर्ण परिसरात घनदाट जंगल आहे. हेच जंगल बिबट्यांसह वन्य प्राण्यासाठी अत्यंत पोषक आहे.

त्यामुळेच आगाशिव डोंगर परिसरातील चचेगाव, विंग, धोंडेवाडी, मलकापूर, काले, नांदलापूर, मुनावळे, ओंडसह परिसरातील विविध गावात अनेकदा बिबट्याचे दर्शन होते. याशिवाय घोगाव, वनवासमाची (खोडशी), वहागाव, सुपने या गावातही अधूनमधून बिबट्याचे दर्शन होते. भक्ष्याच्या शोधार्थ बिबट्या अनेकदा मानवी वस्तीत शिरकाव करतो. त्याचबरोबर मानवी अतिक्रमणामुळे बिबट्या मानवी वस्तीत येत असल्याचे पहावयास मिळते.

आगाशिव डोंगरावरील श्री शंभू महादेव दर्शनासोबत व्यायामासाठी यापूर्वी शेकडो लोक दररोज मलकापूरमधून व्यायामासाठी जात असत. मात्र, सातत्याने दिसणार्‍या बिबट्यासह कळपामुळे स्थानिकांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाल्याचे पहावयास मिळत आहे. त्यामुळेच अनेकांनी बिबट्याच्या भीतीने ‘आगाशिव’कडे पाठ फिरवली आहे. ओंड परिसरात काही महिन्यांपूर्वी बिबट्याने एका दुचाकी चालकावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता.

तसेच येणके येथे सुमारे बारा ते तेरा वर्षांपूर्वी बिबट्या मानवी वस्तीत शिरला होता. यावेळी बिबट्यावर हल्ला करत त्यास ठार केले होते. वास्तविक वनविभागाने योग्य ती दक्षता घेणे आवश्यक होते आणि तसे होऊ न शकल्याने स्थानिक ग्रामस्थांना कायदा हातात घ्यावा लागला होता. आता सोमवारी सकाळी घडलेल्या घटनेमुळे पुन्हा एकदा स्थानिकांमध्ये संतापाची लाट निर्माण झाल्याचे पहावयास मिळत आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्येही ग्रामस्थांचा संताप पहावयास मिळत आहे.

Back to top button