नाशिक (ओझर) : मनोज कावळे
ओझर शहर हे नाशिकचे उपनगर म्हणून उदयास येत असताना शहराचा व ओझर पोलिसांच्या हद्दीचा विचार करता या ठिकाणी सध्या असलेले पोलिस बळ मुळातच तोकडे असताना आता नुकत्याच झालेल्या पोलिस कर्मचाऱ्यांच्या बदल्यांमध्ये ओझर येथील तब्बल २६ पोलिस कर्मचाऱ्यांच्या प्रशासकीय बदल्या झाल्या असून, त्या बदल्यात येथे तितकेच कर्मचारी अपेक्षित असताना फक्त चार कर्मचाऱ्यांची नियुक्ती झाल्याने ओझर पोलिस ठाण्याची अवस्था दुष्काळात तेरावा महिन्यासारखी झाली आहे.
मुंबई-आग्रा महामार्गावरील ओझरचा वाढता विस्तार व दिवसागणिक वाढणारे नागरीकरण तसेच देश संरक्षणाच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचा असलेला मिग विमान कारखाना शिवाय वायुसेनेचे महत्त्वाचे स्टेशन या बाबींचा विचार करता येथे अधिकचे पोलिस बळ गरजेचे आहे. मात्र, कायदा सुव्यवस्थेचे रक्षण करणाऱ्या पोलिसांची कुमक या बदल्यांमध्ये अचानक कमी झाल्याने येणाऱ्या दिवसांत ओझर व परिसराची कायदा व सुव्यवस्था कशी राखणार, असा प्रश्न नागरिकांना पडला आहे. ज्या चार कर्मचाऱ्यांची ओझर पोलिस ठाण्यात बदली झाली. त्यातले दोन चालक असून, इतर दोघे हे उपविभागीय पोलिस अधिकारी यांच्या कार्यालयात कर्तव्य बजावणार आहेत. सरकार दरबारी बदली ही त्यांच्या दृष्टीने सततची क्रिया असली तरी 'दोन न्या आणि दोन द्या' या सूत्राला अनुसरून बदली होणे क्रमप्राप्त असते. परंतु ओझरच्या बाबतीत मात्र २६ जणांची एकाच वेळी झालेली बदली पाहता त्या बदलात केवळ चार कर्मचारी दिले गेले आहे. यामुळे लोकसंख्येत एक लाखाच्या घरात पाय ठेवणारे ओझर अन् त्याला जोडलेल्या सुकेणा दूरक्षेत्राचा विचार केल्यास केवळ ३२ कर्मचारी अन् एक अधिकाऱ्यावर सर्व भार आला आहे. यामुळे रोजचे तपासी तक्ते, साप्ताहिक सुट्या अन् हजेरी वहीत लावलेल्या सेवा पाहता १० ते १२ हजार माणसांमागे एक कर्मचारी खडा पहारा कसा ठेवेल हा मुख्य प्रश्न आहे.
दुसऱ्या वाहनाची गरज
ओझर पोलिस ठाण्याची हद्द ही दहावा मैलपासून ते साकोरे फाट्यापर्यंत आहे. यात ओझर शहर, ओझरच्या आजूबाजूला असलेली सुमारे २५ उपनगरे, दिक्षी, दात्याने, जिव्हाळे, थेरगाव, ओणे, मौजे अन् कसबे सुकेणे ही गावेही येतात. या सर्व बाबींचा विचार करता सध्या असलेले पोलिस बळच कमी असताना त्यातही अजून २६ कर्मचाऱ्यांची बदली झाली आहे तर ओझर पोलिसांच्या हद्दीचा विचार करता या ठिकाणी पोलिसांसाठी एकच वाहन आहे. ते पण कधी-कधी व्हीआयपींच्या दिमतीला असते. त्यामुळे दुसऱ्या वाहनाची गरज व्यक्त होत आहे.
पोलिस आयुक्तालयाचा प्रस्ताव धूळ खात
ओझर पोलिस ठाण्याचा नाशिक पोलिस आयुक्तालयात समावेश होणार याबाबतचा प्रस्ताव गेल्या एक तपापासून धूळ खात आहे. दर सहा महिन्यांनी नाशिक ग्रामीण व नाशिक पोलिस आयुक्तालयाकडून फक्त माहिती मागवण्याचे काम केले जात असून, शासनाकडून फक्त कागदी घोडे नाचवण्याचे काम सुरू असल्याचे समोर येत आहे.
सध्या असलेली पोलिसांची संख्या
पोलिस निरीक्षक :१
स.पो.निरीक्षक : 00
पो.उप निरीक्षक : २ (कार्यकाळ पूर्णत्वाच्या टप्प्यावर)
सर्व पोलिस कर्मचारी: ३१ (पूर्वी ही संख्या ५६ होती)
ओझर पोलिस ठाण्याला गरज…
पोलिस निरीक्षक :१
सह पोलिस निरीक्षक : २
पोलिस उपनिरीक्षक : २
पोलिस कर्मचारी : ६०
अनुभवी तपासी अंमलदार : ३
पोलिस कर्मचाऱ्यांच्या बदलीबाबत गावातील कायदा सुव्यवस्थेचा अभ्यास करूनच मनुष्यबळ दिले गेले आहे. एकूण समाविष्ट बीट आणि गुन्हेगारी तक्ता बघूनच एकूण संख्याबळ ठरवले आहे. येणाऱ्या काळात अधिकची कुमक लागल्यास त्याची पूर्तता केली जाईल. – शहाजी उमाप, पोलिस अधीक्षक, नाशिक.