साध्वी कांचन गिरी म्‍हणाल्‍या, उद्धवनी सेनाप्रमुखांचे नाव बुडवले ! | पुढारी

साध्वी कांचन गिरी म्‍हणाल्‍या, उद्धवनी सेनाप्रमुखांचे नाव बुडवले !

मुंबई ; पुढारी वृत्तसेवा : राज ठाकरे यांच्यामध्ये शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची छबी दिसते. तेच बाळासाहेबांचा संकल्प पूर्ण करतील, असे सांगतानाच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांचे नाव बुडवले, अशी टीका साध्वी कांचन गिरी यांनी येथे केली. साध्वी कांचन गिरी आणि जगतगुरू सूर्याचार्य यांनी राज ठाकरे यांची त्यांच्या कृष्णकुंज निवासस्थानी भेट घेतली, त्यावेळी त्या प्रसारमाध्यमांशी बोलत होत्या.

साध्वी कांचन गिरी यांनी राज ठाकरेंची स्तुती केली, तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार हल्ला चढवला आहे. उद्धव ठाकरेंबाबत मला काही बोलायचे नाही. त्यांनी त्यांचे वडील बाळासाहेब ठाकरे यांचे नाव बुडवले आहे. त्यांनी मुस्लिमांसोबत जाऊन पक्ष बनवला आहे, असा आरोप करतानाच पालघरमध्ये हत्याकांड झाले तेव्हा उद्धव ठाकरे यांनी आपले कान आणि डोळे बंद केले होते, अशी टीकाही त्यांनी केली. बाळासाहेब ठाकरेंप्रमाणे राज ठाकरे आक्रमक नेते आहेत. उत्तर भारतीयांबाबत राज यांच्या मनात पूर्वग्रह निर्माण झाला आहे. तो दूर करण्यासाठीच मी मुंबईत आले आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.

गुरू माँ कांचन गिरी कोण आहेत?

गुरू माँ कांचन गिरी या जुना आखाड्याशी संबंधित आहेत. त्या महिला संत म्हणून प्रसिद्ध आहेत. दिल्लीच्या सेक्टर-5 मधील वैशाली येथे राहतात. त्यांनी मधल्या काळात देश बचाओ आंदोलन सुरू केले होते. हिंदू राष्ट्र व्हावे म्हणून त्यांनी देशभर दौरे सुरू केले आहेत. महाकाल मानव सेवा समितीच्या बॅनरखाली त्यांनी हे अभियान सुरू केले आहे. त्यांनी देशातील अनेक भागात हिंदूराष्ट्र स्थापन्याचे बॅनर्स आणि पोस्टर्स लावले आहेत. हिंदुराष्ट्राची संकल्पना प्रत्यक्षात उतरावी म्हणून त्यांनी महाराष्ट्र, मध्य प्रदेशासह विविध राज्यातील नेत्यांच्या भेटीगाठी सुरू केल्या आहेत.

राज डिसेंबरमध्ये अयोध्येत?

राज ठाकरे यांना साध्वी कांचन गिरी आणि जगतगुरू सूर्याचार्य यांची सुमारे अर्धा तासांची भेट झाली. यावेळी राज ठाकरे यांना अयोध्या दौर्‍याचे निमंत्रण देण्यात आले आणि राज यांनी ते स्वीकारले. ते डिसेंबरमध्ये अयोध्येचा दौरा करणार असल्याचे समजते. ही भेट ठरवून झाली आहे. या भेटीत हिंदू राष्ट्र हा अजेंडा होता. राज ठाकरे यांच्यासारखा माणूस त्यांना हिंदूराष्ट्रासाठी योग्य वाटतो, असे मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी या भेटीबाबत सांगितले.

यूपी- बिहारींवरील अन्यायावेळी कांचन गिरी कुठे होत्या?- सेना

गुरू माँ कांचन गिरी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीकास्त्र सोडल्यानंतर शिवसेनेच्या प्रवक्त्या व मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी प्रत्युत्तर दिले. महाराष्ट्रात येऊन शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या सुपुत्रावर टीका करण्याचा अधिकार कांचन गिरी यांना नाही. जेव्हा उत्तर प्रदेश, बिहारमधील हिंदूंना मुंबईत मनसेकडून मारहाण होत होती, अन्याय होत होता तेव्हा या कांचन गिरी कुठे होत्या? असा सवाल करत कांचन गिरी यांना लक्ष्य केले. सोबतच, मनसेच्या उत्तर भारतीयांच्या भूमिकेवरून शिवसेना आगामी काळात रान पेटवणार असल्याचे संकेत दिले.

Back to top button