नाशिक : डोंगरदर्यातील कपारीतून येणार्या पाण्यासाठी करावी लागतेय पायपीट

नाशिक (इगतपुरी) : वाल्मीक गवांदे
हा धरणांचा तालुका म्हणून ओळखला जातो. या तालुक्यात लहान-मोठी मिळून 16 धरणे असूनही आदिवासी पाड्यांवरील महिलांना घोटभर पाण्यासाठी पायपीट करावी लागते. तालुक्यातील कुरूंगवाडी हा आदिवासी पाडा असून, हा भावली धरणापासून अगदी जवळच आहे. मात्र, येथील महिलांना जंगलातून पायपीट करत डोंगरदर्यातील कपारीतून डबक्यात झिरपणारे पाणी प्यावे लागत आहे. त्यामुळे त्यांच्याबाबत ‘धरण उशाला अन् कोरड घशाला’ असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.
खरे म्हटले तर इगतपुरी तालुक्यात मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो. येथे सुमारे 4 हजार मि.मी. पावसाची नोंद दरवर्षी पावसाळ्यात होते. पावसाचे पाणी अडवून साठवण्यासाठी तालुक्यात लहान-मोठी मिळून 16 धरणे बांधलेली आहेत, तरीही तालुक्यातील छोटी खेडी व वाड्या-पाड्यांवर पिण्याच्या पाण्याची व्यवस्था होऊ शकलेली नाही. त्यामुळे इगतपुरीतील हे भीषण वास्तव कधी मिटणार, असा सवालही उपस्थित होत आहे. खुद्द इगतपुरी शहरात गेल्या 10 वर्षांपासून आठवड्यातून केवळ 3 दिवस पाण्याचा पुरवठा होतो, तर शहरातील खालची पेठ परिसरात कमी दाबाने पाणीपुरवठा केला जात असल्याने अनेक नागरिकांना पाणी मिळत नाही.

तालुक्याच्या ग्रामीण भागात तर पाण्यासाठी डोंगरदर्या कड्या-कपार्यांवर अक्षरशः पाण्याचा शोध घ्यावा लागतो. काही ठिकाणी तर दगडांमधून झिरपणार्या पाण्याच्या थेंबांची साठवण करून हंडा भरला जातो. त्यासाठी कमीत कमी एक ते दोन तासांचा वेळ एका महिलेला लागतो. अशा सर्व महिलांचे पाण्याचा हंडे भरले की, सर्व महिला घराची वाट धरतात. यातून इगतपुरी तालुक्यातील आदिवासी पाड्यांवरील महिलांना पाण्यासाठी कराव्या लागणार्या कसरत आणि मेहनत समजून येते. भारताला स्वातंत्र्य मिळून 75 वर्षे पूर्ण झाली. या पार्श्वभूमीवर अमृतमहोत्सवी वर्ष साजरे केले जात आहे. मात्र दरवर्षी वाड्या-पाड्यांतील नागरिकांना उन्हाळ्यात पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे, याकडे कोणीही लक्ष देत नाही, अशी भयंकर परिस्थिती आहे.