Aditya Thackeray : मंत्रिमंडळ विस्ताराआधीच गद्दारांचे सरकार कोसळेल | पुढारी

Aditya Thackeray : मंत्रिमंडळ विस्ताराआधीच गद्दारांचे सरकार कोसळेल

नाशिक (नांदगाव) : पुढारी वृत्तसेवा

मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याआधीच गद्दारांचे सरकार कोसळेल, असा दावा युवानेते आणि आमदार आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी येथे आयोजित शिवसंवाद यात्रेच्या निमित्ताने केला.

जैन धर्मशाळेत आयोजित कार्यक्रमात त्यांनी शिंदे सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. यावेळी व्यासपीठावर माजी आमदार जगन्नाथ धात्रक, विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, गणेश धात्रक, नरेंद्र दराडे, अल्ताफ खान, संतोष गुप्ता, कुणाल दराडे, माजी आमदार राजाभाऊ देशमुख, अव्दय हिरे, शशिकांत मोरे, अशोक जाधव व्यासपीठावर उपस्थित होते.

येत्या दोन ते तीन महिन्यांत गद्दारांचं सरकार कोसळणार, असे भाकीत करत आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) म्हणाले, सध्याचे सरकार घटनाबाह्य आहे. स्वतःला वाचवण्यासाठी मुख्यमंत्री दिल्लीवारी करतात. उद्धव ठाकरे यांच्या पाठीवर गद्दारांनी वार केले, त्या गद्दारांना त्याची किंमत मोजावी लागेल. आम्ही शून्यावर गेलो तरी १०० आमदार निवडून आणून दाखवू असे सांगत महाराष्ट्रातील अनेक प्रकल्प गुजरातला हलवले. मुख्यमंत्री महाराष्ट्राचे की गुजरातचे हेच कळत नाही. पाच ते सहा प्रकल्प महाराष्ट्राबाहेर गेले तरी राज्यातील तरुणांचा विचार करायला हे सरकार तयार नाही, याकडे त्यांनी लक्ष वेधले.

महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी महाराष्ट्र सरकारकडे पैसे नाही. पण, इतरत्र उधळपट्टीसाठी पैसे आहेत. तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांना भरघोस मदत केली. मात्र, आता काही व्यक्ती आयत्या पिठावर रेषा ओढताना दिसून येत आहेत. मला आपले आशीर्वाद हवे आहेत ते आपण द्यालच, अशी अपेक्षादेखील त्यांनी यावेळी व्यक्त केली.

कांदे यांना धात्रक यांचा टोला

यावेळी गणेश धात्रक यांनी आपले मनोगत व्यक्त करताना माझ्याकडे खोके नाहीत, मात्र सर्व काही ओके आहे, असा खोचक टोला आमदार सुहास कांदे यांचे नाव न घेता लगावला, तर अंबादास दानवे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना २४,००० शेतकरी २०२० च्या पीकविम्यापासून वंचित असून, पीकविमा मिळून देण्यासाठी मुंबईत आंदोलन करण्याची वेळ आली तरी करणार असल्याचे सांगितले.

हेही वाचा :

Back to top button