लियोनल मेस्सी… छोटा पॅकेट, बडा धमाका..! | पुढारी

लियोनल मेस्सी... छोटा पॅकेट, बडा धमाका..!

फुटबॉलमधील प्रतिष्ठेचा समजला जाणारा बॅलन डी’ऑर पुरस्कार पाचवेळा जिंकत ज्याने तमाम फुटबॉल रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवले तो महान खेळाडू म्हणजे लियोनल मेस्सी. 2005 पासून व्यावसायिक फुटबॉलमध्ये स्वतःची कारकीर्द सुरू करणार्‍या या खेळाडूने गेल्या सतरा वर्षांत फुटबॉलमध्ये सर्व काही कमावले. फक्त कमी होती ती विश्वचषकाची. रविवारी झालेल्या अंतिम सामन्यात बलाढ्य फ्रान्सला पराभूत करत मेस्सीने विश्वचषक उंचावत ही कमतरतासुद्धा पूर्ण केली. फुटबॉलप्रेमींसाठी मेस्सी नेहमीच सर्वोत्तम होता. पण, विश्वचषक उंचावल्यानंतर तो महानतेच्या सर्वोत्तम उंचीवर गेला. विश्वचषक उंचावण्याचे हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्याने अंतिम सामन्यात 120 मिनिटे मेहनत घेतली असली तरी त्याचे हे स्वप्न पूर्ण होण्यासाठी तो गेली सतरा वर्षे मेहनत घेत होता, असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही.

एका सामान्य मध्यमवर्गीय कुटुंबात जन्मलेल्या मेस्सीची फुटबॉल कारकीर्द वयाच्या आठव्या वर्षी सुरू झाली. त्याचे वडील एका स्थानिक क्लबला कोचिंग करायचे. घरातच फुटबॉलचे बाळकडू मिळाल्यामुळे त्याला फुटबॉलची आवड लागली. तो स्थानिक क्लबकडून खेळू लागला. पण वयाच्या अकराव्या वर्षी त्याच्यामध्ये शारीरिक वाढ होण्यासाठी आवश्यक हार्मोनची कमतरता दिसून आली. त्याच्या उपचाराचा खर्च कुटुंबीयांना परवडणारा नव्हता त्यामुळे त्याच्या कुटुंबीयांनी उपचारासाठी इतर पर्याय शोधण्यास सुरुवात केली. याचदरम्यान ब्युनास आयर्स येथील रिवरप्लेट क्लबने लियोनल मेस्सी याचा खेळ बघून त्याला आपल्या क्लबमध्ये घेतले, पण त्याच्या उपचाराचा खर्च क्लबलासुद्धा परवडणारा नव्हता.

2000 मध्ये मेस्सीच्या कुटुंबीयांनी स्पेनला जाऊन बार्सिलोना फुटबॉल क्लबने आयोजित केलेल्या निवड चाचणीसाठी मेस्सीला उतरण्याचा निर्णय घेतला. बार्सिलोनाचे तत्कालीन स्पोर्टिंग डायरेक्टर कार्ल्स रेक्सच हे मेस्सीच्या खेळाने प्रभावित झाले आणि त्यांनी लागलीच मेस्सीला बार्सिलोनाच्या युथ टीमसाठी करारबद्ध करण्याचे ठरवले. आश्चर्याची बाब म्हणजे कागद उपलब्ध नसल्यामुळे कार्ल्स रेक्सच यांनी पेपर नॅपकिनवर करारातील मुद्दे लिहीत त्यावर सह्या केल्या आणि मेस्सी बार्सिलोना युथ टीमसाठी करारबद्ध झाला. बार्सिलोना क्लबने त्याचा उपचाराचा सर्व खर्च उचलला.

वयाच्या चौदाव्या वर्षी त्याच्यावरील उपचार पूर्ण झाले आणि तो ग्रोथ हार्मोन कमतरतेच्या आजारातून पूर्णपणे बरा झाला. जगाला लियोनल मेस्सी देण्यामध्ये बार्सिलोना फुटबॉल क्लबचा खूप मोठा वाटा आहे, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. यानंतर त्याने आपली कारकीर्द बार्सिलोनासाठी सुरू केली आणि वयाच्या 24 व्या वर्षी बार्सिलोनासाठी सर्वाधिक गोल करणारा खेळाडू बनला. 2000 ते 2005 पर्यंत तो बार्सिलोनाच्या युथ क्लब, बार्सिलोना ‘सी’ आणि बार्सिलोना ‘बी’ संघांसाठी खेळला.

2004 मध्ये त्याने बार्सिलोना मुख्य संघात प्रवेश केला आणि त्याची व्यावसायिक फुटबॉल कारकीर्द सुरू झाली. पंधरा वर्षांच्या कारकिर्दीत त्याने बार्सिलोनाला यशाच्या शिखरावर नेऊन ठेवले. स्पॅनिश ला लीगा या स्पॅनिश लीग विजेतेपदाबरोबरच बार्सिलोनासाठी अनेक अजिंक्यपद मिळवण्यात त्याचा सिंहाचा वाटा होता. रोनाल्डिन्हो, नेमार, इनिएस्ता, डेको, थीएरी हेनरी यांसारख्या अनेक नामवंत खेळाडूंची साथ त्याला बार्सिलोनाकडून खेळताना मिळाली. 2021-22 या सिझनसाठी तो पॅरीस सेंट जर्मन या फ्रेंच क्लबसाठी करारबद्ध झाला.

संपूर्ण कारकिर्दीत मेस्सीची तुलना अनेक महान खेळाडूंबरोबर झाली. लियोनल मेस्सी उंचीने लहान आणि शरीरयष्टीने किरकोळ असूनसुद्धा आपल्या जादुई खेळाच्या जोरावर त्याने त्याचे फुटबॉलमधील कर्तृत्व सिद्ध केले. त्याच्या पिढीतील महान खेळाडू ख्रिस्तियानो रोनाल्डो आणि त्याच्यामध्ये नेहमीच चढाओढ पाहायला मिळाली. अतिशय शांत, संयमी आणि फुटबॉलप्रती समर्पित हा खेळाडू कधीही वादाच्या भोवर्‍यात सापडला नाही. खरं तर यशाच्या शिखरावर असताना निवृत्त झाले तर त्या खेळाडूचा आदर सन्मान टिकून राहतो. अनेक महान खेळाडूंनी त्यांच्या यशाच्या शिखरावर असताना निवृत्ती स्वीकारलेली आहे.

विश्वचषक जिंकल्यानंतर मेस्सी निवृत्ती जाहीर करेल, असे सर्वांनाच वाटले होते; पण त्याने तसे केलेली नाही. कदाचित त्याने भविष्यातील त्याच्या कारकिर्दीविषयी नक्कीच विचार केला असणार. कदाचित त्याच्यातील शिल्लक असलेले फुटबॉलने त्याला निवृत्तीच्या निर्णयापासून रोखले असेल. त्यामुळे अजून काही काल सर्वांनाच त्याचा खेळ अनुभवयास मिळेल. हा महान खेळाडू कधीही निवृत्त झाला तरी सार्‍या विश्वातील फुटबॉलप्रेमींसाठी तो कायम महान राहील.

व्यावसायिक फुटबॉलच्या कारकिर्दीत त्याने मधील जवळजवळ सर्वच किताब पटकावले आहेत. 2005 साली मेस्सीने अर्जेंटिनासाठी आंतरराष्ट्रीय कारकीर्द सुरू केली. त्याचा पदार्पणाचा सामना फक्त 47 सेकंदाचा राहिला. हंगेरी विरुद्ध झालेल्या सामन्यामध्ये त्याला सबस्टिट्यूट खेळाडू म्हणून मैदानावर पाठवण्यात आले, पण 47 सेकंदातच त्याला रेड कार्ड मिळाल्यामुळे तो मैदानाबाहेर गेला. बार्सिलोनाप्रमाणेच आपल्या देशालासुद्धा विविध स्पर्धेत विजेतेपद मिळवून देत मैदानावरच्या देशसेवेची कामगिरी चोखपणे बजावली.

2016 मध्ये कोपा अमेरिका स्पर्धेवेळी चिली विरुद्ध अंतिम सामना गमावल्यानंतर त्याने आपल्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीला विराम देत निवृत्ती जाहीर केली. सलग तीन कोपा अमेरिकन स्पर्धेच्या अंतिम सामन्यात त्याला अर्जेंटिनाला विजेतेपद मिळवून देण्यात अपयश आले होते. याचे शल्य मनात असल्यामुळे त्याने निवृत्ती जाहीर केली, पण फुटबॉलप्रती आणि देशाप्रती असलेले प्रेम त्याला 2018 च्या विश्वचषक पात्रता फेरीसाठी पुन्हा मैदानावर घेऊन आले. 2018 च्या विश्वचषक स्पर्धेत अर्जेंटिनाला उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात फ्रान्सकडून मानहानीकारक पराभव पत्करावा लागला, पण या लढवय्या खेळाडूने 2022 च्या विश्वचषक स्पर्धेचे विजेतेपद मिळवत अर्जेंटिनाचे आणि स्वतःचे स्वप्न पूर्ण केले.

– प्रा. डॉ. श्रीनिवास पाटील

Back to top button