कमकुवत सरकारमुळे सीमावाद वाढला : राऊत | पुढारी

कमकुवत सरकारमुळे सीमावाद वाढला : राऊत

मुंबई : सध्या महाराष्ट्रात अत्यंत कमजोर आणि हतबल सरकार असल्यामुळे महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद निर्माण होत आहे. राज्यातील सरकार लवकर घालवले नाही तर राज्याचे पाच तुकडे केल्याशिवाय केंद्र सरकार आणि त्यांचे हस्तक राहणार नाहीत, असा आरोप शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी बुधवारी केला. राऊत यांनी शिंदे – फडणवीस सरकारवर हल्लाबोल केला. कोणाला मुंबई तोडायचीय तर कोणाला महाराष्ट्राचे जिल्हे आणि गावे तोडायची आहेत. गेल्या साडेतीन महिन्यापासून महाराष्ट्र कुरतडण्याचे काम सुरु आहे. राज्यातील सरकार लवकरात लवकर न घालवल्यास केंद्राचे हस्तक राज्याचे पाच तुकडे केल्याशिवाय राहणार नाहीत, असे राऊत म्हणाले. तसेच, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री 40 आमदारांना घेऊन गुवाहाटीला निघाले आहेत. तिकडून आल्यावर आसामच्या मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्रातील एखाद्या जिल्ह्यावर दावा करु नये म्हणजे झाले, असा टोलाही त्यांनी लगावला.
सीमावासीयांवरील खोटे गुन्हे मागे घेण्यास भाग पाडा
दरम्यान, सीमावासीयांवर खोटे गुन्हे मागे घेण्यासाठी कर्नाटकावर सरकारने दबाव आणावा, अशी मागणीही खासदार संजय राऊत यांनी केली.

Back to top button