जुन्नर तालुक्यात भेसळयुक्त ताडी व्यवसाय फोफावला | पुढारी

जुन्नर तालुक्यात भेसळयुक्त ताडी व्यवसाय फोफावला

बेल्हे, पुढारी वृत्तसेवा: औरंगपूर, बेल्हे, साळवाडी, चौदा नंबर शिवारात भेसळयुक्त ताडी व्यवसाय फोफावले असून, भेसळयुक्त ताडीमुळे जुन्नर तालुक्यात तरुण मृत झाले आहेत. जुन्नर तालुक्यातील येडगाव येथील तरुण भेसळयुक्त ताडी पिऊन मृत झाला. औरंगपूर, निमगावसावा, साळवाडी, चौदा नंबर, बेल्हे परिसरातील अनेकांना भेसळयुक्त ताडीसेवनामुळे मेंदूचे आजार जडल्याचे चित्र पाहावयास
मिळत आहे. बेल्हे, औरंगपूर, साळवाडी, चौदा नंबर परिसरात राजरोसपणे ताडी विक्री केंद्रे असली, तरीही त्या ठिकाणी खरोखरच शुद्धता मिळते का? हा संशोधनाचा विषय असून, पावडर मिश्रितही ताडी अनेकांच्या जीवितास धोकादायक ठरत आहे.

बेल्हे, औरंगपूर, चौदा नंबर, साळवाडी परिसरात सर्वसामान्यांच्या जीविताला धोकादायक ठरणारी विषारी ताडी केंद्रे खुलेआम सुरू असून, या ताडीबाबत ’तेरी भी चूप मेरी भी चूप’ असाच बिनबोभाट कारभार चाललाय. जो भविष्यात अत्यंत धोकादायक ठरणार आहे.
खरेतर या केंद्रातील ताडी ही शुद्ध आहे की ती पावडरमिश्रित आहे, हे तपासणार कोण? पावडरमिश्रित अर्थात विषारी ताडी अनेकांच्या जिवावर उठली आहे.

वास्तविक, ताडीचा हंगाम फेब्रुवारी ते जून यादरम्यान असतो. या हंगामातच शुद्ध ताडी मिळते. मात्र, सध्या ताडी देणारी झाडेच नसल्यामुळे ताडी विक्रेते धोकादायक आणि घातक असे क्लोरिल हायट्रिक मिक्स करून ताडी विकत असून, यामुळे अनेक जण या घातक व्यसनाच्या आहारी जाऊन बळी पडत आहेत.

Back to top button