पुणे : बी. एड. प्रवेशासाठी आज गुणवत्ता यादी | पुढारी

पुणे : बी. एड. प्रवेशासाठी आज गुणवत्ता यादी

पुणे; पुढारी वृत्तसेवा : राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्ष अर्थात सीईटी सेलकडून शिक्षक होण्यासाठी आवश्यक बी. एड. अभ्यासक्रमासाठी नोंदणी 30 सप्टेंबरपासून सुरू आहे. या नोंदणीला दोनदा मुदतवाढ दिल्यानंतर अखेर सोमवारी (दि. 21) पहिल्या फेरीसाठीची गुणवत्ता यादी जाहीर होणार असून 22 नोव्हेंबर रोजी जागांचे वाटप होणार आहे. 23 ते 25 नोव्हेंबरदरम्यान विद्यार्थ्यांना प्रवेश घेता येणार असून 30 डिसेंबरपर्यंत प्रवेश संपविण्याचे निर्देश सीईटी सेलकडून देण्यात आले आहेत.

बी.एड. प्रवेश प्रक्रिया यंदा लांबणीवर पडली आहे. 2022-2023 शैक्षणिक वर्षातील विविध अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया सुरू आहे. मात्र, बी.एड. अभ्यासक्रमाच्या प्रक्रियेला विलंब होत आहे. सीईटी सेलतर्फे दोन फेर्‍या आणि संस्थास्तरावरील प्रवेशाच्या संभाव्य तारखांची घोषणा करण्यात आली आहे. सद्य:स्थितीत प्रवेशाच्या दोन फेर्‍या आणि संस्थास्तरावरील प्रवेशाचे वेळापत्रक जाहीर झाले आहे.

प्रत्येक फेरीत विद्यार्थ्यांना पसंतीक्रम भरावा लागणार आहे. तसेच प्रारूप गुणवत्ता यादी प्रसिद्ध करत त्यावर हरकत मागविण्यात येतील.
महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांचे झालेले प्रवेश 23 ते 28 नोव्हेंबरदरम्यान पोर्टलवर नोंदवायचे आहेत. दुसर्‍या फेरीसाठी 29 नोव्हेंबरला रिक्त जागा जाहीर केल्या जातील. तर 30 नोव्हेंबरपासून दुसरी फेरी प्रारंभ होणार आहे. 30 नोव्हेंबर ते 2 डिसेंबरदरम्यान विद्यार्थ्यांना पसंतीक्रम भरता येणार आहे. कागदपत्रे अपलोड करण्यासाठी 3 डिसेंबरची मुदत देण्यात आली आहे.

Back to top button