Sidharth Shukla : सिद्धार्थ शुक्लाच्या निमित्ताने… | पुढारी

Sidharth Shukla : सिद्धार्थ शुक्लाच्या निमित्ताने...

डॉ. अनिल मडके

Sidharth Shukla हिंदी मालिकेतील लोकप्रिय अभिनेता, यशस्वी मॉडेल आणि बिग बॉसचा विजेता सिद्धार्थ शुक्ला या जिममध्ये जाणार्‍या चाळिशीतल्या दणकट शरीरयष्टीच्या तरुणाच्या मृत्यूमुळे ‘आकस्मिक हृदय मरण’ हा विषय चर्चेत आला आहे.

गेल्याच महिन्यात मुंबईतील डॉ. दिप्तीमन रॉय (वय 45) या क्ष किरण तज्ज्ञाला जिममध्ये व्यायाम करताना आपला जीव गमवावा लागला. डॉ. विजय घोरपडे (वय 39) या नवी मुंबईतील मराठमोळ्या डॉक्टरला अगदी सकाळीच कार्यालयात काम करताना मृत्यूने गाठले. जिमबाहेर अस्वस्थ होऊन जिन्यावर बसल्याजागी अचानक मृत्युमुखी पडलेल्या एका तरुणाचा व्हिडीओ गेल्याच आठवड्यात व्हायरल झाला होता.

हृदयाच्या आरोग्यासाठी एका खाद्यतेलाची जाहिरात करणार्‍या सौरभ गांगुलीलाच जिममध्ये व्यायाम करताना हार्ट अटॅक आल्याची आणि त्यानंतर तातडीने अँजिओप्लास्टी केल्याची घटना फार जुनी नाही. यानिमित्ताने काही युवकांचा जिममधील अतिरेकी व्यायाम, झटपट सिक्स पॅकचा हव्यास, बाजारू फिटनेस प्रोटिन्सचा वापर, स्टेरॉईडसारख्या औषधांचा शरीरसौष्ठवासाठी मारा आणि या सर्व पार्श्वभूमीवरील ‘आकस्मिक हृदय मरण’ यांची आता चर्चा सुरू आहे.

अशा व्यक्ती किंवा घटना, काही अघटित घडण्यापूर्वीच ओळखता येतील का? येतील तर त्या कशा? आणि त्याअन्वये यशाच्या शिखरावरील असे युवा मृत्यू टाळता येतील का? या प्रश्नांचा विचार आवश्यक ठरतो.
आकस्मिक हृदय मरण (र्डीववशप उरीवळरल ऊशरींह) म्हणजे हृदयाच्या एखाद्या आजारामुळे अचानकपणे – ध्यानीमनी नसताना होणारा मृत्यू.

हृदयाचा हा सर्वात गंभीर आणि धोकादायक आजार. कारण यात उपचाराला वेळच मिळत नाही. ‘प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर’ हा मंत्रच अनेकांचा जीव वाचवू शकतो. अतिव्यायाम करणार्‍या युवकांमध्ये नि अ‍ॅथलेटस्मध्ये असे मृत्यू अधिक होतात. छातीत दुखणे, अस्वस्थ वाटणे अशा तक्रारी सुरू झाल्यानंतर एका तासातील मृत्यू म्हणजे ‘आकस्मिक हृदय मरण’.

स्त्रियांपेक्षा पुरुष खेळाडूंमध्ये नऊपट असणारा हा विकार युवावर्गात शक्यतो अनुवंशिक कारणांमुळे येतो. चाळीशीनंतर मात्र याच्या मुळाशी रक्तवाहिन्यांचे काठिण्य (Atherosclerosis) हे कारण असते. चाळिशीनंतरसुद्धा आकस्मिक हृदय मृत्यूचे प्रमाण खूप आहे.

हृदयाच्या रचनेमधील आनुवंशिक दोष, हृदयस्पंदन बिघाड, हृदयाच्या स्नायूतील विद्युत वहन बिघाड, हृदय स्नायूदोष, झडपांचे विकार, जंतुसंसर्ग, मुका मार, घातक रसायने – औषधे किंवा बाजारू अन्नघटक ही आकस्मिक हृदय मरणाची कारणे आहेत.

आकस्मिक हृदय मरण (Sudden Cardiac Death) म्हणजे हार्ट अटॅक नव्हे. रक्तवाहिन्यांमध्ये गुठळ्या होऊन हृदयाच्या स्नायूचा रक्तपुरवठा बंद होऊन तो स्नायू मृतवत होणे म्हणजे हार्ट अटॅक. अनेक आकस्मिक हृदय मृत्यूचे हे कारण असले तरी, ते ‘आकस्मिक हृदय मरण’ नव्हे.

या आजारात हृदयातील विद्युत आवेगामध्ये बिघाड निर्माण होतो नि हृदयाचे धडधडणे थांबते. सर्व शरीराला रक्त पाठवण्याचे – पंपिंग करण्याचे कामच थांबते . याला Sudden Cardiac arrest असेही म्हणतात. रक्तदाब कमी होतो. सर्व शरीराचा आणि मेंदूचा रक्तपुरवठा बंद पडतो. शुद्ध हरपते. श्वसन प्रक्रिया थांबते. मनुष्य जागच्या जागी कोसळतो.

असा अचानक मृत्यू होण्यापूर्वी काही व्यक्तींमध्ये काही लक्षणे जाणवतात. व्यायाम करताना हलकीशी चक्कर येते. छातीत मध्यभागी किंवा डावीकडे बारीक दुखते. छातीत अस्वस्थ वाटते, धडधडते, नाडीचे ठोके अनियमित होतात. श्वास घ्यायला त्रास होतो. त्वचा पांढरट पडते. हातपाय थंड होतात.

थोड्याशा श्रमाने खूप थकायला होते. दम लागतो. अशावेळी तातडीने विश्रांती घ्यावी. तातडीने डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. असे केले नाही तर व्यक्तीची शुद्ध हरपते आणि मृत्यू येतो. काही व्यक्तींच्या बाबतीत वरीलपैकी एकही तक्रार दिसून येत नाही. व्यायाम करताना अचानक हृदय थांबते. अशा व्यक्तीच्या जवळच्या नातेवाईकाच्या बाबतीत अशी घटना घडलेली असू शकते.

हार्ट अटॅक आल्यास रक्ताची गुठळी विरघळणारी औषधे देऊन वा अँजिओप्लास्टी करून जीव वाचवता येतो. पण आकस्मिक हृदय मरणाच्या बाबतीत हृदयाचा विद्युत आवेग सुरू करण्यासाठी तातडीने हृदयासाठीचा विद्युत शॉक देऊन उपचार करावे लागतात .

पुष्ट हृदयस्नायू विकार (Hypertrophic Cardiomyopathy) हे खेळाडूंमधील आकस्मिक हृदय मरणाचे सर्वात महत्त्वाचे कारण आहे. या आनुवंशिक विकारात हृदयाचे स्नायू पुष्ट, म्हणजे आकाराने मोठे आणि कठीण होतात. त्यामुळे डाव्या जवनिकेचे (Left Ventricle) आकारमान कमी होते. डावी जवनिका आणि उजवी जवनिका यांच्यामधील भिंतदेखील पुष्ट होते. यामुळे हृदयाच्या आकुंचन-प्रसरणात-रक्त पंप करण्यात अडथळा येतो.

तसेच हृदय स्नायूतून होणारे विद्युतवहन अनियमित होते. हृदयाचे ठोके अनियमित होतात. याला ‘व्हेंट्रिक्युलर फिब्रिलेशन’ म्हणतात. यामुळे हृदयाचे ठोके अचानकपणे थांबतात आणि ‘आकस्मिक हृदय मरण’ येते.
सुरुवातीच्या टप्प्यात पुष्ट हृदयस्नायू विकाराची (Hypertrophic Cardiomyopathy) कोणतीही लक्षणे दिसत नाहीत. त्यामुळे मुद्दाम तपासणी करून घेतल्याशिवाय त्याचे निदान होत नाही. हृदयाचा आलेख ECG काढून निदान होते. इको कार्डिओग्राफीने ते पक्के होते.

अशा व्यक्तींनी खेळात भाग घेऊ नये. रोगाच्या पुढच्या टप्प्यात, थोड्या श्रमाने थकवा येणे, दम लागणे, छातीत धडधडणे, हृदयाचे ठोके अनियमित वाटणे, श्वासाची लय बिघडणे, सौम्य खोकला येणे, पित्त – मळमळणे, चक्कर तसेच धाप लागणे, पायावर सूज येणे अशा तक्रारी दिसतात. मानसिक ताणतणाव हे कारण पुष्ट हृदयस्नायू विकार गंभीर करते.

सभोवतालच्या वातावरणातील ताण देखील आजाराची तीव्रता वाढवतो. उच्च रक्तदाब, हृदयविकार, थायरॉईड विकार, मूत्रपिंडविकार, मद्यपान – धूम्रपानाचे व्यसन असेल तर ही समस्या गंभीर होते. याचे निदान करण्यापूर्वी कौटुंबिक इतिहासाची नोंद करून छातीचा एक्स-रे, रक्तचाचण्या, ईसीजी, इको कार्डिओग्राफी, आवश्यक तर अँजिओग्राफी, न्यूक्लियर स्कॅन आणि जेनेटिक चाचणी केली जाते. हृदयाची गती आणि नियमितता यांच्या परीक्षणासाठी इंप्लान्टेबल कार्डिओव्हर्टर डिफिब्रिलेटर (ICD) नावाचे यंत्र छातीच्या त्वचेखाली बसवले जाते. व्हेंट्रिक्युलर असिस्ट डिव्हाइस (VAD) पेसमेकर यांचाही फायदा होतो. काही व्यक्तींमध्ये शस्त्रक्रिया करून स्नायूचा काही भाग काढल्यामुळे हृदयाचे ठोके नियमित होण्यास मदत होते.

कमोसीओ कॉर्डिस (Commotio Cordis) या विकारात अचानक कोणी छातीवर मोठा ठोसा दिला, (उदा. बॉक्सिंग) तर हृदयाचे ठोके अनियमित होऊन आकस्मिक हृदय मरण येऊ शकते. याशिवाय आनुवंशिक किंवा अन्य कारणांमुळे हृदयाच्या नैसर्गिक विद्युत वहनात अडथळा येतो. त्यामुळे हृदयाचे तालबद्ध आकुंचन-प्रसरण कोलमडते आणि हृदयाचे धडधडणे अनियमित होते. अशी व्यक्ती चक्कर येऊन बेशुद्ध होते. नशिबाने काही वेळा हे दुरुस्त होते आणि हृदय पूर्ववत होते. पण काहींच्या बाबतीत हे ‘आकस्मिक हृदय मरणा’पर्यंत जाऊन पोहोचते. त्यामुळे एखादी चक्कर – भोवळ – अस्वस्थ वाटणे याकडे दुर्लक्ष न करता तातडीने वैद्यकीय सल्ला घ्या. हृदयाच्या अनियमिततेच्या ( Arrythmias) तपासणीसाठी इलेक्ट्रोफिजिऑलॉजिकल मॅपिंग उपयुक्त ठरते.

व्हेंट्रिक्युलर फिब्रिलेशन (Ventricular Fibrillation) झाल्यास हृदयाच्या जवनिका ताकदीने रक्त पंप करण्याऐवजी केवळ थरथरतात. त्यामुळे हृदय थांबते. अशावेळी तातडीने सीपीआर (Cardio Pulmonary Resuscitation) ही उपचार पद्धती अवलंबली, ऑक्सिजनचा सलग पुरवठा केला तसेच हृदयासाठीच्या विद्युत शॉकचा उपयोग केला तरच रुग्णाचा जीव वाचतो. पुढे मूळ कारण शोधून हृदयाच्या स्नायूशी किंवा झडपाशी संबंधित शस्त्रक्रिया, अँजिओप्लास्टी, बायपास शस्त्रक्रिया आणि इतर औषधोपचार दिले जातात.

तुम्ही जर तरुण असाल, म्हणजे वयाची चाळिशी – पन्नाशी अजून पार केली नसेल आणि जर तुम्ही नियमितपणे जिममध्ये जात असाल तर आधी तुमची आरोग्य तपासणी करा. तुमचे वजन, हृदयाचे ठोके, त्यांची नियमितता, रक्तदाब, रक्तातील साखर, कोलेस्टेरॉल, थायरॉईड, ईसीजी आणि इको कार्डिओग्राम या तपासण्या करा. दर वाढदिवसापूर्वी या चाचण्या आवर्जून करा. कारण हे आजार कधी सुरू होतील सांगता येत नाही. जिममधील प्रवेशासाठी या आरोग्य चाचण्या कायद्याने सक्तीच्या व्हायला हव्यात. जिममधील ट्रेनरला CPR उपचार पद्धतीची माहिती हवी. तातडीचे वैद्यकीय उपचार आणि अ‍ॅम्ब्युलन्स सेवा जिमशी संलग्न हव्यात.

आजच्या सेल्फी युगात चांगले – आकर्षक दिसण्यासाठी केवळ स्त्रियाच नव्हे तर, पुरुषांमध्ये सुद्धा जणू स्पर्धा आहे. त्यात जर ती व्यक्ती मॉडेलिंग – फॅशन – सिरियल – अल्बम – सिनेमा वगैरे ‘दिसण्याच्या’ क्षेत्रात असेल तर, मग शरीर हेच त्यांचे त्या अर्थाने भांडवल असते आणि मग त्या शरीराला घाईगडबडीने धष्टपुष्ट करण्यामागे अनेक जण लागतात. मुळात शरीर हे भांडवल असेल तर ते निरोगी असणे अधिक महत्त्वाचे. निरोगी शरीर आकर्षक दिसते आणि अधिक टिकते. पण आकर्षक शरीर निरोगी असेलच असे नाही.

मित्रहो, सिक्स पॅकच्या नादी लागून नको त्या प्रमाणात प्रथिनांचा ओव्हरडोस घेऊ नका. अतिप्रमाणातील प्रोटिन्समुळे हृदयविकार बळावतो. स्टेरॉईडसारख्या औषधांचा परिणाम केवळ हृदयावर नव्हे तर मूत्रपिंडावर आणि सार्‍या शरीरावर होतो. बाजारातील, रस्त्यावरील, वाट्टेल ते खाणे – जंक फूडस, कोल्ड्रिंक्स, धूम्रपान, मद्यपान, ड्रग्ज हे धोकादायकच आणि अतिचरबीयुक्त आहार, तेलकट तुपकट – गोड पदार्थ हृदयासाठी हानीकारकच असतात.

आजच्या धकाधकीच्या जीवनात, गळाघोटू स्पर्धेत टिकण्यासाठी अनेक जण नाना क्लृप्त्या करतात. धाव धाव धावतात. तरुण वयात ना खाण्या-पिण्याची फिकीर, ना पुरेशा शारीरिक विश्रांतीची भ्रांत. स्वत:च्या मनाविरुद्ध, काही वेळा मनासारखं बेबंद वागणं. नैतिक – अनैतिकच्या सीमारेषा धूसर. मूल्य कुणाचं, किती नि कशाचं? जो तो ‘सेल्फि-श ’. कामात नाटक – जगण्यात नाटक. खरीखुरी माणसं डिजिटल दुनियेत कुठं? व्हर्च्युअल जगात दु:ख जाणणारं – अश्रू पुसणारं कुणी मिळालं नाही तर, ती जागा कोण भरून काढणार? – गोळ्या, पिल्स, ड्रिंक्स, ड्रग्ज…? मित्रांनो जागे व्हा. अचानक कायमचे झोपी जाण्यापूर्वी… जागे व्हा.

Back to top button