नाशिक : शासनाने ओला दुष्काळ जाहीर करावा – ज्येष्ठ नेते पंडितराव निकम | पुढारी

नाशिक : शासनाने ओला दुष्काळ जाहीर करावा - ज्येष्ठ नेते पंडितराव निकम

नाशिक (देवळा) : पुढारी वृत्तसेवा

तालुक्यात बुधवारी, दि.19 रात्री झालेल्या मुसळधारमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. त्यामुळे शासनाने ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी विठेवाडी येथील शेतकरी व राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पंडितराव निकम यांनी केली आहे.

देवळा तालुक्यात बुधवारी (दि.१९) रात्री मुसळधारमुळे शेती पिकांचे नुकसान झाले आहे. बहुतांश ठिकाणी विशेषतः भऊर, विठेवाडी या परिसरात अतिवृष्टी झाली असून, शेतात पाणी साचल्याने लागवड केलेल्या लाल रांगडा कांदा वाहून गेला आहे. त्याचप्रमाणे द्राक्ष, डाळिंब, कोबी, सोयाबीन, मका आदी हातातोंडाशी आलेली पिके खराब झाली आहेत. पिकांना महागडे औषधे वापरूनही फायदा झाला नसून, शासनाने सरसकट पंचनामे करावेत व ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी जोर धरू लागली आहे.

तसेच उन्हाळी कांद्याला भाव नसल्याने शेतकरी आर्थिकदृष्ट्या कमकुवत झाला आहे. एकीकडे शेती मालाला भाव मिळत नसून पिकांना सततच्या बदलत्या वातावरणाचा फटका बसत असून अतिवृष्टीमुळे शेतात साचलेले पाणी यामुळे शेतकरीवर्ग कमालीचा धास्तावला आहे. शासनाने याची दखल घेऊन नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तत्काळ नुकसानभरपाई द्यावी. ऐन दिवाळीच्या तोंडावर पावसाने कहर केल्याने बाजारपेठेवर परिणाम झाला आहे. आर्थिक विवंचनेत सापडलेल्या शेतकऱ्यांपुढे दिवाळी सण कसा साजरा करावा असा यक्ष प्रश्न उपस्थित झाला आहे. शेती व्यवसाय अतिवृष्टीमुळे निस्तनाबूत झाल्याने बळीराजावर आर्थिक संकट ओढावले आहे. त्यामुळे शासनाने ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी विठेवाडी येथील पंडितराव निकम यांनी केली आहे.

हेही वाचा:

Back to top button