दसरा मेळाव्यात आवाज कुणाचा घुमणार | पुढारी

दसरा मेळाव्यात आवाज कुणाचा घुमणार

मुंबई; राजेश सावंत : शिवसेनेमध्ये उभी फूट पडल्यामुळे यंदा मुंबईकरांना प्रथमच दसरा मेळाव्यात विचाराचे सोने लुटले जाणार नाही, तर ठाकरे व शिंदे गटाचे शक्तिप्रदर्शन बघायला मिळणार आहे. दसरा मेळाव्याला गर्दी जमवण्यासाठी दोन्ही गटांमध्ये स्पर्धा लागली असून दुभंगलेल्या शिवसैनिकांमध्ये अक्षरश: संचार भरला आहे. त्यामुळे 5 ऑक्टोबरला होणार्‍या दसरा मेळाव्यात आवाज कुणाचा.. यावर शिक्कामोर्तब होणार आहे.

मुंबईत 1966 पासून शिवसेनेचा दसरा मेळावा धूमधडाक्यात साजरा करण्यात येतो. बाळासाहेबांच्या निधनानंतर दसरा मेळाव्यातील जोश काही प्रमाणात कमी झाला. परंतु, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दसरा मेळाव्याची प्रथा-परंपरा तितक्याच जोमाने सुरू ठेवण्याचा प्रयत्न केला. जय महाराष्ट्र करत, अनेक जण शिवसेनेमधून बाहेर पडले. मात्र शिवसेना डगमगली नाही. दसरा मेळावेही बंद झाले नाहीत. मात्र बाळासाहेब व आनंद दिघे यांचा कडवट शिवसैनिक असलेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बाहेर पडल्यानंतर शिवसेनेमध्ये मोठी फूट पडली. शिवसैनिक ठाकरे व शिंदे गटांत विभागले गेले. शिवसेनेचे आमदार, खासदार, नगरसेवक शिंदे गटात सामील झाले. त्यामुळे शिवसेनेच्या इतिहासात प्रथमच दोन दसरा मेळावे होत आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाला या अगोदरच एमएमआरडीएचे भव्य मैदान मिळाले असून आता शिवसेनेलाही शिवाजी पार्क देण्यासाठी थेट कोर्टानेच निर्देश दिले. त्यामुळे दोन्ही दसरा मेळावे भव्यदिव्य होणार हे निश्चित आहे. दोन्ही मैदानांची सुमारे एक लाख नागरिक मावतील इतकी क्षमता आहे. त्यामुळे दोन्ही मैदाने हाऊसफुल्ल करण्यासाठी शिवसेना व शिंदे गटांकडून आतापासूनच जोरदार तयारी सुरू झाली आहे.

शिंदे गटात सामील झालेल्या खासदारांसह आमदार यांच्यावरही जास्तीत जास्त नागरिक दसरा मेळाव्यात आणण्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. त्याशिवाय शिंदे गटात आलेल्या विविध शहरांतील आजी-माजी नगरसेवकांकडेही नागरिकांना मुंबईत आणण्याची जबाबदारी सोपवली आहे. यासाठी लागणारा बस व अन्य गाड्यांचा खर्च, जेवण, नाश्ता याची जबाबदारी त्या त्या पदाधिकार्‍यांनी स्वीकारावी, असे निर्देशही दोन्ही गटांकडून पदाधिकार्‍यांना देण्यात आले आहेत. त्यामुळे यंदाच्या दसरा मेळाव्याकडे मुंबईकरांसह संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे.

Back to top button