राजू शेट्टी यांचे १२ आमदारांच्या यादीतील नाव वगळणार? | पुढारी

राजू शेट्टी यांचे १२ आमदारांच्या यादीतील नाव वगळणार?

मुंबई : पुढारी वृत्तसेवा

10 महिन्यांपासून प्रलंबित असलेल्या राज्यपालनियुक्त 12 आमदारांच्या यादीत माजी खासदार राजू शेट्टी यांचे नाव अडचणीत आल्याचे वृत्त आहे. तांत्रिक कारणामुळे शेट्टी यांचे नाव वगळावे लागणार, असे सूत्रांनी सांगितले.

निवडणुकीत पराभूत झालेल्या उमेदवाराची नियुक्ती विधान परिषदेवर अशी राज्यपालांमार्फत करता येत नाही, असा नवा मुद्दा पुढे आला आहे. तो चर्चेत येताच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एका वृत्तवाहिनीला सांगितले की, हा नवा मुद्दा कितपत योग्य आहे, हे आम्ही तपासून पाहू.

सरकारने पाठवलेल्या बाराजणांच्या यादीत राष्ट्रवादीकडून राजू शेट्टी यांचे नाव देण्यात आले. गेले दहा महिने राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी या यादीवर कोणताही निर्णय घेतलेला नाही. शेवटी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी बुधवारी राजभवनावर जाऊन राज्यपालांची भेट घेतली. या यादीवर योग्य निर्णयघेऊ, इतकेच आश्वासन राज्यपालांनी दिले.

त्यानंतर गुरुवारी दुसर्‍याच दिवशी राजू शेट्टी यांच्या नावावर राजभवनाने फुली मारल्याचे वृत्त पसरले.

शेट्टी गेल्या लोकसभा निवडणुकीत हातकणंगलेमधून शिवसेनेचे उमेदवार धैर्यशील माने यांच्याकडून पराभूत झाले. हाच पराभव राजू शेट्टी यांच्या विधान परिषदेवरील नियुक्तीत अडसर बनल्याचे सांगितले जाते. याच निकषावर राजभवनावर गेलेल्या यादीत नाव असलेले प्रा. यशपाल भिंगे आणि अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांचीही नियुक्ती अडचणीत येऊ शकते.

यशपाल भिंगे नांदेड लोकसभा मतदारसंघातून अशोक चव्हाण यांच्याविरोधात वंचित बहुजन आघाडीकडून दीड लाखापेक्षा अधिक मतांनी पराभूत झाले होते. अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांनी काँग्रेसकडून 2019 ची लोकसभा निवडणूक लढवली होती, त्यादेखील पराभूत झाल्या होत्या. यानंतर त्यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत शिवसेनेत प्रवेश केला आहे.

मला काही फरक पडत नाही ः शेट्टी

राष्ट्रवादीसोबत झालेल्या समझोत्याची माहिती देऊन राजू शेट्टी यांनी या घडामोडींवर प्रतिक्रिया देत सांगितले की, राज्यपालांनी जो निर्णय घ्यायचा आहे तो घ्यावा. मला काहीही फरक पडत नाही.

 

Back to top button