नाशिक (सिन्नर) : पुढारी वृत्तसेवा
शहर व परिसरात रात्री-अपरात्री घरफोड्या, दुचाकी, चारचाकी वाहनांच्या चोरीच्या घटनांमध्ये वाढ होत असतानाच गेल्या काही दिवसांपासून भरदिवसा घरफोड्या होऊ लागल्या आहेत. नायगाव रोडलगत रेणुकानगर भागातील लहामगेनगर येथे सोमवारी (दि.22) दुपारी 12 ते 1.45च्या दरम्यान धाडसी घरफोडी झाली. अज्ञात चोरट्यांनी दोन लाखांची रोकड व सोन्या-चांदीचे दागिने असा सुमारे 2 लाख 58 हजार 500 रुपयांचा ऐवज चोरून नेल्याने खळबळ उडाली आहे. चोरट्यांना पोलिसांचा धाक उरला नाही का, यंत्रणाच गलितगात्र झाली आहे, असा सवाल नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे.
दामोदरनगर भागात साई गॅलेक्स रो हाउसमध्ये उज्ज्वला यशवंत बोराडे (45) कुटुंबीयांसह राहतात. ग्रामदैवत भैरवनाथ महाराज मंदिराजवळ त्यांचा फुले-हार विक्रीचा व्यवसाय आहे. पती-पत्नी दोघेही दुकानात आलेले होते. अज्ञात चोरट्यांनी दरवाजाचा कडी-कोयंडा तोडून आत प्रवेश केला. कपाटात असलेली दोन लाखांची रोकड व सोन्याचे दागिने चोरट्यांनी चोरून नेले. बोराडे यांचा मुलगा शुभम हा एकटाच घरी होता. दुपारी 12 च्या दरम्यान तो दुकानाकडे आला होता. त्याचे डोके दुखायला लागल्याने परत दीडच्या सुमारास घरी परतला असता, घरामध्ये चोरी झाल्याचे त्याच्या लक्षात आले. यावेळी कपाटामध्ये ठेवलेले दोन लाख रुपये रोख व दीड तोळ्याचा नेकलेस, दीड तोळ्याचे कानातील वेल, एक तोळ्याची कर्णफुले, अडीच ग्रॅम वजनाचे ओमपान असा ऐवज चोरीस गेल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पोलिसांना माहिती दिल्यानंतर पोलिस निरीक्षक संतोष मुटकुळे, पोलिस उपनिरीक्षक सुदर्शन आवारी, पोलिस नाईक राहुल इंगोले, चेतन मोरे, समाधान बोराडे, स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलिस हवालदार रवींद्र वानखेडे, विनोद टिळे यांनी घटनास्थळी पंचनामा केला. ठसेतज्ज्ञ पथकाने घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. सिन्नर पोलिस घरफोडीचा अधिक तपास करीत आहेत.
बचतीच्या रकमेवर डल्ला : बोराडे यांचा फूल भांडारचा व्यवसाय आहे. या व्यवसायातून होणारी बचत थोडी थोडी करून जमा करून ठेवली होती. आवश्यक कामाकरिता ही रक्कम वापरता येईल, असा बोराडे यांचा हेतू होता. मात्र चोरट्यांनी त्यावर डल्ला मारल्याने कष्टाने जमवलेली दोन लाखांची रक्कम चोरीस गेल्याने बोराडे कुटुंबीय हवालदिल झाले आहे.
'त्या' चोरीचा तपास नाही : दरम्यान, भैरवनाथनगर परिसरातील संभाजीनगरमधील आठ-दहा दिवसांपूर्वी सूरज प्रकाश कडभाने यांच्या बंद घरात चोरी झाली होती. रोख 25 हजारांसह सात तोळ्यांचे सोन्याचे दागिने चोरून नेल्याची घटना ताजी आहे. अशातच चोर्या वाढू लागल्याने पोलिसांच्या कामगिरीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
एस. टी. कॉलनीतही चोरीत दीड लाखाचा ऐवज लांबविला :
शहरातील एस. टी. कॉलनीत चोरट्यांनी बंद घरात घरफोडी करत अडीच तोळे सोन्याच्या दागिन्यांसह चांदीचे दागिने असा सुमारे दीड लाखांचा ऐवज चोरून नेल्याची घटना रविवारी (दि.21) सायंकाळी उघडकीस आली. येथील एस.टी. कॉलनीत वास्तव्यास असलेले बाळनाथ भानुदास घोटेकर यांच्या मूळ गावी घोटेवाडी येथे देवस्थान आश्विननाथ महाराज यात्रोत्सव असल्याने बुधवारी (दि. 17) घोटेकर कुटुंबीय घराला कुलूप लावून घोटेवाडी येथे गेले होते. हीच संधी साधत चोरट्यांनी घोटेकर यांच्या घराच्या दरवाजाचे कुलूप व कडी-कोयंडा तोडून आत प्रवेश करत उचकापाचक केली. घरातील कपाटात असलेली एक तोळा वजनाची सोन्याची पोत, एक तोळा वजनाचे नेकलेस, 6 ग्रॅमचे कानातले, चांदीच्या तोरड्या व ब्रेसलेट असा जवळपास दीड लाख रुपयांचा ऐवज चोरून पोबारा केला. पोलिसांनी घटनास्थळी पाहणी केली तसेच श्वान पथकालाही पाचारण करण्यात आले होते. तथापि पावसामुळे सर्वत्र ओलावा असल्याने श्वान पथकाला माग काढणे शक्य झाले नाही. बाळनाथ घोटेकर यांच्या फिर्यादीवरून सिन्नर पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरोधात चोरीचा गुन्हा दाखल केला आहे.
…अन् चोरी उघडकीस आली
रविवारी सकाळी बाळनाथ घोटेकर हे घोटेवाडी येथून थेट त्यांच्या कामावर गेले. सायंकाळी घरी परतल्यानंतर घराचा दरवाजा अर्धवट उघडलेल्या अवस्थेत त्यांना दिसला. त्यांनी आत जाऊन पाहिले असता, घरातील वस्तू अस्ताव्यस्त पडलेल्या निदर्शनास आल्या. घरात चोरी झाल्याचा संशय आल्याने घोटेकर यांनी लगेच कुटुंबीयांना फोन करून सिन्नरला बोलावून घेतले. त्यानंतर चोरीचा उलगडा झाला. बाळनाथ घोटेकर यांनी सिन्नर पोलिस ठाण्यात जाऊन चोरीची फिर्याद दिली.