धारावी मध्ये सिलिंडरने पेट घेतल्याने १५ जखमी | पुढारी

धारावी मध्ये सिलिंडरने पेट घेतल्याने १५ जखमी

धारावी ; पुढारी वृत्तसेवा : धारावी पश्चिम येथील जस्मिन मिल रोडवरील कमला नेहरूनगरमध्ये एका घरगुती सिलिंडरला गळती लागून आग भडकल्याने 15 रहिवासी जखमी झाल्याची धक्कादायक घटना रविवारी दुपारी घडली. सर्व जखमींवर पालिकेच्या शिव रुग्णालयात उपचार सुरू असून यातील पाच जणांची प्रकृती चिंताजनक आहे.

आल्तमश (4), अब्दुल्ला (21), शौकतभाई (55), फिरोज अहमद (32), शाबिन (34), अबिद (32), फैयाज अन्सारी (27), आसमा (18), साबीर (42), अरिफ (36), राजेश कुमार, त्याची पत्नी व मुलीसह दोन अज्ञात व्यक्तींचा समावेश असून यात एकाच कुटुंबातील महिलेसह चिमुरडीचा समावेश आहे.

धारावी येथील कमला नेहरू नगरमध्ये दोन महिन्यांपूर्वी आमिरा उल्ला या कुटुंबासह राहायला आल्या होत्या. येथील एका घराच्या तिसर्‍या मजल्यावर त्या भाड्याने राहत होत्या. आमिरा रविवारी दुपारचे जेवण बनवण्यात व्यस्त असताना गॅस गळतीने सिलिंडरने पेट घेतला. त्यांनी पाणी टाकून आग विझविण्याचा प्रयत्न करताच आग आणखीन भडकली. त्यामुळे धास्तावलेल्या त्यांच्या घरच्यांनी तात्काळ पेटता सिलिंडर तिसर्‍या मजल्यावरून चिंचोळ्या गल्लीत फेकला. सिलिंडर जमिनीवर आदळताच जोराचा आवाज झाला. भरलेल्या सिलिंडरमधून आग संपूर्ण गल्लीत पसरल्याने गल्लीत आरडाओरड सुरू झाली.

सिलिंडरचा स्फोट होईल, या धास्तीने हादरलेल्या रहिवाशांनी त्या चिंचोळ्या गल्लीतून आगीपासून स्वतःला वाचवत रस्त्याच्या दिशेने धावण्यास सुरुवात केली. या धावपळीत आगीच्या संपर्कात आल्याने अनेकांच्या कपड्यांनी पेट घेतला. कपड्यांनी पेट घेतलेल्या अवस्थेत रहिवासी गल्ली बाहेर पडतानाचे भयावह दृश्य पाहून रस्त्यालगत राहणार्‍या रहिवाशांनी त्यांच्या अंगावर पाण्याचा मारा करत आग विझविण्याचा प्रयत्न केला आणि तातडीने त्यांना शिव रुग्णालयात दाखल केले.

या आगीची माहिती मिळताच वडाळा अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेऊन पेटलेल्या सिलिंडरची आग आटोक्यात आणली. चिंचोळ्या गल्लीत भडकलेल्या आगीमुळे एका घराचा दरवाजा, घराबाहेर सुकविण्यात ठेवलेले कपडे आगीच्या भक्षस्थानी पडले. या प्रकरणी शाहूनगर पोलीस, अग्निशमन दलाचे अधिकारी तपास करत आहेत.

Back to top button