जळगाव : स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव दिनी महिलेचा आत्मदहनाचा प्रयत्न | पुढारी

जळगाव : स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव दिनी महिलेचा आत्मदहनाचा प्रयत्न

  • जळगाव: पुढारी वृत्तसेवा

येथील जिल्हाधिकारी कार्यालयात मंत्री गुलाबराव पाटील ध्वजारोहण करत असतानाच ध्वजारोहण सोहळ्याच्या कार्यक्रमात एका महिलेने आत्मदहनाचा प्रयत्न केला. या प्रकारामुळे एकच खळबळ उडाली आहे. या अचानक घडलेल्या प्रकारामुळे प्रशासनाची चांगलीच धावपळ उडाली.

या संदर्भात वृत्त असे की,सोमवार दि.१५ शासकीय ध्वजारोहण झाल्यानंतर ना.गुलाबराव पाटील यांचे भाषण सुरू असतांना मागील बाजूला जामनेर तालुक्यातील वंदना पाटील या महिलेने आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. या महिलेने अंगावर रॉकेल घेऊन स्वत:ला पेटवून देण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलीसांनी सतर्कता दाखविल्यामुळे संबंधीत महिलेला इजा झाली नाही. या महिलेस पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. अचानक घडलेल्या या प्रयत्नामुळे प्रचंड खळबळ उडाली.

न्याय मिळत नसल्याने आत्मदहनाचा प्रयत्न…
जामनेर येथील सुनील पाटील व त्यांची पत्नी वंदना सुनील पाटील याचा काही धान्य व्यापाऱ्यांनी शेतमालाची परस्पर विक्री करत फसवणूक केल्याचा आरोप आहे. त्यांनी फसवणूक करणाऱ्या व्यापाऱ्यांवर फौजदारी गुन्हा दाखल करण्याची त्यांची मागणी आहे. परंतु कारवाई होत नसल्याने वंदना पाटील आणि सुनील पाटील यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण केले होते. परंतु प्रशासन त्यांच्या मागणीची दखल घेत नसल्याने महिलेनं आत्मदहनाचा प्रयत्न केला. मंत्री गुलाबराव पाटील ध्वजारोहण करत असतानाच या महिलेन स्वतःवर रॉकेल ओतून पेटवून घेण्याचा प्रयत्न केल्यामुळे एकच धावपळ उडाली. परंतू पोलिसांनी प्रसंगावधान दाखवत वेळीच या महिलेला रोखल्यामुळे मोठा अनर्थ टळला आहे. दरम्यान, पोलिसांनी या महिलेला ताब्यात घेतले आहे.

या प्रकरणाची चौकशी करणार- गुलाबराव पाटील
शासकीय ध्वजारोहणाचा कार्यक्रम आटोपल्यानंतर ना. गुलाबराव पाटील म्हणाले की, सुनील गुजर यांच्या प्रकरणाची मला पूर्ण माहिती आहे. या प्रकरणी आधीच पूर्ण चौकशी झालेली आहे. आता या प्रकरणाची नव्याने चौकशी करण्यात येणार असल्याची घोषणा त्यांनी केली.

Back to top button