कुरकुंभमध्ये चोरट्यांचा धुमाकूळ | पुढारी

कुरकुंभमध्ये चोरट्यांचा धुमाकूळ

कुरकुंभ : पुढारी वृत्तसेवा : दौंड तालुक्यातील कुरकुंभमध्ये चोरट्यांनी धुमाकूळ घातला आहे. चोरट्यांनी येथील दोन व मुकादमवाडीतील एक, असे एकूण तीन दुकाने फोडली आहेत. या चोरीचे चित्रीकरण सीसीटीव्ही कॅमेर्‍यात कैद झाले आहे. याबाबत कुरकुंभ पोलिस मदत केंद्रात उशिरापर्यंत तक्रार दाखल करण्याचे काम सुरू होते. कुरकुंभ चौकातील हेल्थकेअर मेडिकल, एक मोबाईल दुकान, तसेच मुकादमवाडी येथील एका मेडिकलचे शटर उचकटून चोरट्यांनी रात्री आत प्रवेश करून चोरी केली.

हा प्रकार गुरुवार सकाळी उघडकीस आला. चोरीसाठी चार चोर कुरकुंभ चौकात दाखल झाले. हेल्थकेअर मेडिकल समोर चोरट्यांवर कुत्रे भुंकत होते. यामुळे चोरट्यांनी कुर्त्यांवर दगड भिरकावून हाकलून लावल्याचे चित्रीकरण सीसीटीव्ही कॅमेर्‍यात कैद झाले आहे.
हेल्थकेअर मेडिकलचे शटर उचकटून एक चोरटा आत शिरून व दुसर्‍या चोरट्याकडे मुद्देमाल चोरून देत असल्याचे दिसून येत आहे. कुरकुंभ पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली आहे.

रात्री उशिरापर्यंत चोरीची नोंद करण्याचे काम सुरू असल्याने नेमकी किती मुद्देमाल चोरीस गेला, याबाबत सविस्तर माहिती उपलब्ध होऊ शकली नाही. या चोरीच्या पार्श्वभूमीवर परिसरात पोलिसांनी रात्री गस्त वाढविण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.

Back to top button