सांगली : ट्रकवर दुचाकी आदळून एक ठार; हिवरेजवळील घटना | पुढारी

सांगली : ट्रकवर दुचाकी आदळून एक ठार; हिवरेजवळील घटना

विटा; पुढारी वृत्तसेवा : खानापूर तालुक्यातील भिवघाट ते पळशी रस्त्यावर हिवरे गावाच्या हद्दीत ट्रकवर दुचाकी आदळून झालेल्या अपघातात दुचाकीस्वार जागीच ठार झाला. नवनाथ जनार्दन पाटील (वय 60, रा. पळशी, ता. खानापूर) असे मृताचे नाव आहे. नवनाथ पाटील हे रक्षाबंधन सणासाठी बहिणीकडे विट्याला जात असताना ही दुर्दैवी घटना घडली.

याबाबत माहिती अशी की, गुरुवारी सकाळी विजापूर ते गुहागर राष्ट्रीय महामार्गावरून कराडच्या दिशेने ट्रक (के.ए. 23, ए. 3441) हा ट्रक निघाला होता. रस्ता विचारण्यासाठी भिवघाट परिसरातील एका पेट्रोल पंपा समोर तो थांबला होता. त्याचवेळी पळशीकडून विट्याकडे नवनाथ पाटील हे दुचाकी (एम. एच. 10, डी. सी. 2915) वरून भरधाव वेगाने निघाले होते. वाटेत थांबलेल्या ट्रकला दुचाकीची जोराची धडक झाली. यात नवनाथ पाटील हे गंभीर जखमी झाले. त्यांना त्यांचे बंधू राजाराम पाटील यांनी तत्काळ रुग्णालयात दाखल केले. उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच खानापूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिस उपनिरीक्षक जालिंदर जाधव तपास करीत आहेत.

Back to top button