उजनी धरणाची शंभरीकडे वाटचाल | पुढारी

उजनी धरणाची शंभरीकडे वाटचाल

बेंबळे : पुढारी वृत्तसेवा पुणे जिल्ह्यात व भीमा खोर्‍यात झालेल्या दमदार पावसामुळे व भीमा खोर्‍यातील बहुतेक धरणे भरली आहेत. उजनी धरणात बंडगार्डन व दौंड येथून येणारा मोठा विसर्ग आता कमी झाला आहे. सध्या धरणामध्ये 81.86 टक्के पाणीसाठा झाला असून संथ गतीने का होईना उजनी धरणाची वाटचाल शतकाकडे सुरू आहे. उजनी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात असलेल्या 19 धरणापैकी 10 धरणांनी शतक ठोकले आहे. त्यामुळे तेथून जादा झालेले पाणी नदीपात्रात सोडण्यात येत आहे. जसजसा पाऊस वाढत जाईल तसतसे पाण्याचा विसर्ग वाढवण्यात येणार असल्याने यापुढे उजनीत येणार्‍या विसर्गात वाढ होण्याची शक्यता आहे.

मध्यंतरी भीमानदी पाणलोट क्षेत्रातील 10 धरणे ’फुल्ल’ झाली आणि त्यातून उजनी धरणात विसर्गही सुरू झाला होता. परंतु, उजनी धरण परिसरात पुरेसा पाऊस झाला नसल्याने पाणीसाठा 70 ते 80 टक्क्यांदरम्यान कमी वेग होता. पावसाच्या उघडीपमुळे धरण भरण्याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. अनेक दिवसांपासून उजनी धरणात नवीन पाण्याची आवक पूर्णपणे थांबली होती. त्यातच पाऊसही थांबल्याने धरणातील पाण्याचा उपसा वाढला होता. त्यामुळे धरणातील पाणी पातळी पुन्हा रोडावेल, अशीच काहीशी परिस्थिती होती.
दरम्यान, आता पुन्हा उजनीच्या पाणलोट क्षेत्रात पावसाने सुरूवात केल्याने आशा पल्लवीत झाल्या आहेत.

गुरूवारी एका दिवसात 32 मीमी पावसाची नोंद झाली आहे. एक जूनपासून आजपर्यंत 380 मीमी पाऊस झाला आहे.उजनी धरणावर पुणे, नगर व सोलापूर जिल्ह्यातील शेती व पिण्याच्या पाणी योजना अवलंबून आहेत. त्यामुळे या तीन जिल्ह्यातील शेतकरी व नागरिकांचे या धरणाच्या पाणीसाठ्यावर लक्ष असते. 13 जुलै रोजी धरण ‘प्लस’मध्ये आल्यानंतर व त्यानंतर धरणातील पाण्यामध्ये सातत्याने वाढ होत राहिल्यामुळे या भागातील शेतकर्‍यांनी मोठ्या प्रमाणात आडसाली उसाची लागवड केली आहे. सध्या धरणातील पाण्यामध्ये चांगली वाढ होत आहे.

दि. 05/08/22 उजनी धरणातील पाणीपातळी सायं 6 वा.
ए.पातळी 495.980 मी
ए.पाणीसाठा 3044.73दलघमी (101.28टीमसी)
उप.साठा..+1241.92 दलघमी (43.85) टीमसी
टक्केवारी+81.86%
येणारा विसर्ग
दौंड ः 4728
बंडगार्डन ः 3280
नीरा ः बंद
आजचा पाऊस ः 32 मीमी
एकुण पाऊस ः 380 मीमी

पाणीसाठ्यात सातत्याने वाढ

चालू वर्षी जुलै महिन्यापासून उजनी धरण क्षेत्रामध्ये सुरुवातीपासून सातत्याने पाऊस होत होता. त्यामुळे धरणातील पाणीसाठ्यामध्ये नियमित वाढ होत होती. 13 जुलै रोजी धरण ‘प्लस’मध्ये आले. त्यानंतर बरोबर दहा दिवसांत धरणातील पाणीसाठा 70 टक्के झाला आहे. धरणातील पाण्यामध्ये सातत्याने नियमितपणे वाढ होत आली आहे.

Back to top button