‘मुळा’ झाले 20 हजारी! धरणात 77 टक्के पाणीसाठ्याची नोंद | पुढारी

‘मुळा’ झाले 20 हजारी! धरणात 77 टक्के पाणीसाठ्याची नोंद

राहुरी :  पुढारी वृत्तसेवा : दक्षिण नगर जिल्ह्याची तृष्णा भागविणार्‍या मुळा धरणाच्या पाणलोट क्षेत्रावर दहा दिवसांपासून पावसाचा वर्षाव कमी झाला होता. त्यामुळे 20 हजार दलघफू पाणी पातळीच्या समीप पाणीसाठा घुटमळत होता. अखेर मुळा धरण साठा 20 हजार 11 दलघफू (76.96 टक्के) झाल्याची नोंद पाटबंधारे विभागाकडे झाली आहे. मुळा धरणाची पाणी साठवणूक क्षमता 26 हजार दलघफू इतकी आहे. दरम्यान, मुळा धरणाच्या पाणलोट क्षेत्र असलेले कोतूळ, पांजरे, हरिश्चंद्रगड पट्ट्यामध्ये पावसाचा जोर कमी झाला होता.

आषाढी अंतिम काळासह श्रावण काळातही मोठ्या पावसाची नोंद न झाल्याने 500 ते 600 क्यूसेक इतकी कमी आवक धरणाकडे होत होती. त्यामुळे धरण साठा धिम्या गतीने सरकत असताना, 20 हजार दलघफू पाणी पातळी गाठण्यासाठी दहा दिवसांचा अवधी लागला. मुळा पाटबंधारे विभागाचे शाखा अभियंता शरद कांबळे यांनी दिलेल्या माहितीनुसार गुरूवारी सायंकाळी 6 वाजता धरण साठा 20 हजार 1 दलघफू इतका झाल्याची नोंद झाली आहे.

धरणाकडे मुळा पाणलोट क्षेत्रातील कोतूळ सरिता मापन केंद्राकडून केवळ 704 क्यूसेक प्रवाहाने आवक होत असल्याची नोंद झालेली आहे. अत्यल्प आवक होत असल्याने अत्यंत धिम्या गतीने पाणीसाठा वाढत आहे. आषाढ सरींच्या कृपेने धरण साठ्यात झपाट्याने वाढ झाली. परंतु, धरणाच्या पाणलोट क्षेत्रावर पावसाने उसंत घेतली असल्याने श्रावण सरींवर धरण पूर्ण क्षमतेने भरण्याची अपेक्षा लागलेली असल्याचे कांबळे यांनी सांगितले.

मुळा धरण पूर्ण क्षमतेने भरण्यासाठी अजूनही 6 हजार दलघफू इतक्या पाणी साठ्याची गरज आहे. लाभक्षेत्रावर श्रावण सरींचा धो धो वर्षाव झाला आहे. परंतु, पाणलोट क्षेत्र अजूनही श्रावण सरींची वाट पाहत आहे.

Back to top button