मुलीचे खोटे लग्न लावून लुटणारी टोळी उघडकीस, सोलापुरातील मायलेकीसह पाचजणांवर गुन्हा | पुढारी

मुलीचे खोटे लग्न लावून लुटणारी टोळी उघडकीस, सोलापुरातील मायलेकीसह पाचजणांवर गुन्हा

सांगली / सोलापूर; पुढारी वृत्तसेवा : आर्थिक स्वार्थासाठी पोटच्या मुलीचे खोटे लग्न लावून लाखो रूपये लुटणा-या मायलेकीस पोलिसांनी अटक करून बेड्या ठोकल्या आहेत. सांगलीतील विटा पोलिसांत पाचजणांवर गुन्हा दाखल दाखल झाला आहे.

सांगलीतील हिवरे येथील दत्तात्रय नागेश हसबे (वय ३१, रा. हिवरे, ता. खानापूर) यांना एक लाख ७५ हजार रुपयांना गंडा घातल्याची फिर्याद त्यांनी दिली. या प्रकरणात सोलापूर व कर्नाटक राज्यातील पाच जणांविरुद्ध विटा पोलिसांत गुन्हा दाखल आहे. जयश्री गदगे (रा. जुगुल, ता. चिकोडी, कर्नाटक), सुनील दत्तात्रय शहा (रा. निपाणी, कर्नाटक), धनम्मा उर्फ धानुबाई नागनाथ बिराजदार, मुलीची आई दीपाली विकास शिंदे व मुलगी प्रियांका विकास शिंदे (सर्व रा. सोलापूर) अशी संशयितांची नावे आहेत. मुलीची आई दीपाली शिंदे (वय ४०) व नववधू प्रियांका शिंदे (वय २१) यांना विटा पोलिसांनी अटक केली आहे.

हिवरे येथील दत्तात्रय हसबे या तरुणाचा काही केल्या विवाह जमत नव्हता. त्यामुळे हसबे हा त्याचा मित्र संजय खिलारी याच्या ओळखीच्या कर्नाटकातील जयश्री गदगे या लग्न जुळविणाऱ्या महिलेकडे दोघेजण गेले. त्यावेळी संबंधित महिलेने सोलापूर येथे मुलगी चांगली आहे. परंतु, मुलीच्या घरच्यांना एक लाख व लग्न जुळविणारे एजंट सुनील शहा व धनम्मा उर्फ धानुबाई बिराजदार यांना ७० हजार रुपये द्यावे लागतील, असे सांगितले. मोबाईलवर मुलगी प्रियांका शिंदे हिचा फोटो पाहून हसबे याने पैसे देण्यास होकार दिला.

मुलगीला हिवरेत आणण्यासाठी हसबे याने जयश्रीला ऑनलाइन पाच हजार रुपये दिले. दि. २७ जुलै रोजी रात्री नऊ वाजता संशयित जयश्री गदगे, सुनील शहा, धनम्मा बिराजदार, मुलगी प्रियांका हे गावात आले. त्याच रात्री दोघांचा विवाह लावून दिला.

३० जुलै रोजी दीपाली शिंदे ही हिवरेत आली. तिने कपडे घ्यायचे आहेत, असे सांगून मुलीला घेऊन गेली. त्यांच्यासोबत दत्तात्रय व नातेवाईक गेले. दीपालीने भिवघाटातून प्रियांकाला सोलापूरला घेऊन जाण्याची तयारी केली. फिर्यादी दत्तात्रयने तिला विचारणा केली असता खोटे लग्न लावून देण्यासाठी २० हजार रुपये दिल्याचे दीपालीने सांगितले. त्यामुळे आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच दत्तात्रय हसबे याने विटा पोलिसांत जयश्री गदगे, सुनील शहा, धनम्मा बिराजदार, दीपाली शिंदे व प्रियांका शिंदे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. दीपाली व प्रियांका शिंदे यांना पोलिसांनी अटक केली आहे.

Back to top button