नारायण राणे यांचे पुढचे लक्ष्य अनिल परब? | पुढारी

नारायण राणे यांचे पुढचे लक्ष्य अनिल परब?

मुंबई; पुढारी वृत्तसेवा : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या जनआशीर्वाद यात्रेस शुक्रवारी पुन्हा सुरुवात होत आहे. राणे आणि शिवसेना यांच्यात सुरू झालेल्या संघर्षाचा दुसरा अध्याय सुरू होण्याची शक्यता आहे. रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात तीन दिवसांची ही यात्रा असेल. मात्र सिंधुदुर्ग जिल्ह्यात पोलिसांनी जमावबंदी लागू केली असून राणे ही बंदी झुगारून यात्रा काढणार काय, याबद्दल उत्सुकता आहे. परिवहन मंत्री अनिल परब हे राणे यांचे पुढचे लक्ष्य असतील, अशी चर्चा आहे.

काहीही झाले तरी राणे यांची यात्रा शुक्रवारपासून सुरू होणार असल्याची माहिती भाजप नेते प्रसाद लाड यांनी दिली. जनआशीर्वाद यात्रेचा तिसरा भाग सुरू ठेवण्याचा निर्धार भाजप आणि नारायण राणे यांनी केला असल्याचे ते म्हणाले.

राणे यांचा बालेकिल्ला असलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातच ही यात्र जाणार असल्याने शिवसेना आणि राणे समर्थक यांच्यातला संघर्ष आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे. तीन दिवसांच्या या तिसर्‍या टप्प्यात दोन दिवस सिंधुदुर्ग जिल्ह्यात ते असतील. या यात्रेच्या निमित्ताने भाजपकडून जोरदार शक्‍तिप्रदर्शन होण्याची शक्यता आहे.

या पार्श्‍वभूमीवर शिवसेना नेते संजय राऊत यांना भुवनेश्‍वर दौरा सोडून मुंबईत परत येण्याचे आदेश पक्षनेतृत्वाने दिल्याची माहिती आहे. त्यानुसार राऊत गुरुवारी संध्याकाळीच मुंबईत पोहोचले आहेत.

परिवहन मंत्री अनिल परब यांनी राणे यांच्या अटक प्रकरणात पोलिसांना आदेश देऊन हस्तक्षेप केल्याचे संभाषण पुढे आल्याने परब हे आता राणे यांचे पुढचे लक्ष्य असतील, अशी शक्यता आहे. या प्रकरणाची सीबीआयकडून चौकशी करण्याची मागणी भाजपचे नेते आशिष शेलार यांनी केली आहे. भाजपच्या या पवित्र्याने परब अडचणीत येण्याची शक्यता असून त्यांची आणखी काही प्रकरणे बाहेर काढू, असा इशाराच भाजपकडून देण्यात आला आहे.

अमित शहा यांचा राणे यांना फोन

राणे यांच्या अटकेनंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी राणे यांना फोन करून सर्व प्रकरणाची माहिती घेतल्याने भाजपचे केंद्रीय नेतृत्व आता यात लक्ष घालणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे शिवसेनेतही चिंतेचे वातावरण असल्याची चर्चा आहे.

Back to top button