काँग्रेस मधील प्रदेश कार्यकारिणीवर ४८ जाती-जमाती

मुंबई ; पुढारी वृत्तसेवा : प्रदेश काँग्रेस मधील 190 पदाधिकार्‍यांची कार्यकारिणी गुरूवारी जाहीर झाली असून यात राज्यातील 48 जातीजमातीना प्रतिनिधीत्व देण्यात आले आहे. काँग्रेसचे दिवंगत खासदार राजीव सातव यांच्या पत्नी डॉ. प्रज्ञा सातव यांच्यासह अठरा जणांची उपाध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली आहे. तब्बल सात वर्षांनी पूर्ण कमिटी बनली आहे. तर या कमिटीत पटोले यांच्या बरोबर सार्वजानिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांचे वर्चस्व या कार्यकारिणीवर दिसत आहे.

पटोले यांनी प्रदेश अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर तब्बल सहा महिन्यानंतर काँग्रेसने कार्यकारिणी जाहीर केली आहे. जुन्या कार्यकारिणीतील काही पदाधिकारी आणि नव्याचा मेळ हा प्रदेशाध्यक्ष पटोले यांच्या कार्यकारिणीत घालण्यात आला आहे. काँग्रेस मधील जुन्या नेत्यांच्या नव्या पिढीला या कार्यकारिणीत प्रतिनिधीत्व दिले आहे. गणेश पाटील , अमर राजूरकर, देवीदास काळे, उल्हास काळे, किशोर गजभिये, सय्यद खतीब, तुकाराम रेंगे पाटील यांची उपाध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली आहे.

अमरजीत सिंग मनहास यांची खजिनदार म्हणून नियुक्ती केली आहे. काँग्रेसच्या अब्दुल रहमान, अभय छाजेड, अमर काळे, अमर पटेल , हेमलता पाटील यांच्या 32 जणाची नेमणूक केली आहे. 104 जनाची सचिवपदी नेमणूक करण्यात आली आहे. इतक्या मोठ्या प्रमाणावर सचिव नेमण्याची ही पहिली वेळ आहे.

आगामी महापालिका आणि जिल्हा परिषदांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही कार्यकारिणी गठित करण्यात आली आहे. या आधीच्या कार्यकारिणीतील प्रवक्त्यांना कायम ठेवले आहे. सांगली जिल्हाध्यक्षपदी विक्रमसिंह सावंत , सोलापूर ग्रामीण जिल्हाध्यक्षपदी धवलसिंह यांच्यासह ठाणे, भिवंडी, उल्हासनगर असे 14 जिल्हाध्यक्ष नेमले आहेत.

Exit mobile version