सोलापूर : आचेगाव परिसरात ढगफुटीसद‍ृश पाऊस | पुढारी

सोलापूर : आचेगाव परिसरात ढगफुटीसद‍ृश पाऊस

हंजगी; पुढारी वृत्तसेवा : दक्षिण सोलापूर तालुक्यातील आचेगाव, हंजगी, हालचिंचोळी व वळसंग परिसरात ढगफुटीसद‍ृश पावसाने दाणादाण उडवली. अवघ्या चार तासांत तब्बल 105 मिलीमीटर पावसाची नोंद झाली. या पावसात जय हिंद शुगर्सच्या गोडावूनमधील साखर भिजून सुमारे 15 कोटी रुपयांचे नुकसान झाले.

चार-साडेचार तास मुसळधार पाऊस या परिसरात झाला. नेमक्या सकाळच्यावेळी पाऊस सुरू झाल्याने ग्रामस्थ, नोकरदार, विद्यार्थी घरीच अडकून पडले. आचेगाव, हंजगी परिसरातील ग्रामस्थांनी प्रथमच इतक्या मोठ्या पावसाचा सामना केला. अनेकांच्या शेतातील बांध फुटून शिवारातील माती वाहून गेली. तसेच गावातील अनेक घरांची पडझड झाल्याने संसार उघड्यावर पडले. या पावसामुळे खरीप पीक पाण्यात थांबल्याचे चित्र पाहायला मिळाले.

आचेगावातील जय हिंद शुगर्सला या पावसाचा सर्वाधिक फटका बसला. कारखान्याच्या गोडावूनवरील टर्पोलिन शेडचे पावसात मोठे नुकसान झाले.

यामुळे गोडाऊनमधील साखर भिजून सुमारे 15 कोटी रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती कारखान्याचे कार्यकारी संचालक आर. पी. देशमुख यांनी दिली.

जयहिंद साखर कारखाना परिसरातील शेतातील बांध फुटून मोठ्याप्रमाणात पाणी गोडाऊनमध्ये शिरले. या घटनेची माहिती समजताच तातडीने चेअरमन गणेश माने देशमुख, मार्गदर्शक बब्रुवान माने देशमुख, व्हा.चेअरमन विक्रम पाटील आदींनी गोडाऊनमधील साखर सुरक्षित स्थळी हलविण्याची कार्यवाही युध्दपातळीवर सुरु केली. गोडाऊनमधून साखर इतरत्र हलवताना बराच वेळ गेला तोपर्यंत गोडाऊनमधील बरीच साखर भिजून पाण्यात वाहत होता. यामध्ये जयहिंद शुगर्सचे 15 कोटी रुपयांचे नुकसान झाले.

Back to top button